मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत या चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हाही दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार…मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, अशी घोषणा आ. आव्हाड यांनी ट्विट करून केली आहे. ही घोषणा करण्यापूर्वी आ. आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशाराही दिला आहे.
कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवीयाना चित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली होती. या प्रकरणी त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीनही मंजूर केला.
आ. आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर आता आणखी एका प्रकरणात त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आ. जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचाच राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासांत दोन खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४… मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असे ट्विट आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी आ. आव्हाड यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘चाणक्य नाही शकुनी मामा…. शइंदे साहेब जपून राहा’ अशा आशयाचे ट्विट आ. आव्हाड यांनी केले आहे. आ. आव्हाड यांच्या या ट्विटचा संबंध शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी जोडला जात आहे.
आ. आव्हाड यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात आणले तेव्हा आपल्या कुटुंबीयाशी बोलताना मी पोलिसांच्या ताब्यात असताना एक चाणक्य पोलिसांना सतत फोन करत होता. पोलीस कोठडीत मला जेवणही मिळू नये असा प्रयत्न होता, असा खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर हा चाणक्य म्हणजे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के असल्याचे समोर आले होते.
काय आहे प्रकरण?: मुंब्रा येथील एका पुलाचे लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे लोकार्पण करून मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होत असताना भाजप कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ रिदा रशीद आणि आ. आव्हाड हे आमने-सामने आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून ते पुढे निघून गेले होते.
‘आव्हाड यांनी मला जाणीवपूर्वक अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत रीदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुंब्रा पोलिसांनी आ. आव्हाड यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मागील तीन दिवसांमध्ये आ. आव्हाड यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे ७२ तासांत माझ्या विरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत संतापलेल्या आ. आव्हाड यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
ठाण्यात तणाव, ठिकठिकाणी जाळपोळः दरम्यान, आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच ठाण्यात तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ करून वाहतुकीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्यातील विवीयाना मॉल जवळर आ. जितेंद्र आव्हाड यांचे घर आहे. या घराजवळच्या रस्त्यावर काही ठिकाणी जळालेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आहे.