बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी त्यांच्याकडे तसे सह्यांचे पत्र दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात धडाक्यात होत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात उठलेल्या या गदारोळावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर मौन सोडले. ‘ही चर्चा तुमच्या मनात आहे, आमच्यापैकी कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही,’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही. मी तुम्हाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरते सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने चालत आहेत. आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तीशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, असे शरद पवार म्हणाले.
मी थोड्यावेळाने देहू येथे जाणार आहे. तेथून रात्री मुंबईला रवाना होईन. मी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली ही बातमी खोटी आहे. अशी कोणतीही बैठक ठरलेली नाही. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या भागातील बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. या निवडणुकीची जबाबदारी या दोघांवरच आहे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांच्या या स्पष्टीकरणानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार फुटून अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चेविषयी पत्रकारांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तात करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार हे आमदारांशी व्यक्तिशः संपर्क साधत असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या बंडाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी जाहीरपणे मांडल्यामुळे पाणी कुठेतरी मुरतेय, अशीही चर्चा सुरू झाली. तर काही आमदारांनी मात्र असे काहीही नसून आम्ही कुठेही सह्या केलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे. आता शरद पवारांच्या स्पष्टीकरणानंतर तरी अजित पवारांच्या कथित बंडाच्या चर्चा थांबणार का? हे पहावे लागेल.