चंद्रपूर/नागपूरः मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याचा डाव सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्रे देण्याच्या विरोधात अखिल कुणबी समाजानेही भूमिका घेतली असून आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
निजाम कालीन महसुली अभिलेखात किंवा शैक्षणिक अभिलेखात नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णयही आज जारी जारी करण्यात आला आहे.
मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी चंद्रपूर शहरात राष्ट्रीय ओबीसी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण ओसीबी आरक्षणाला धक्का न लावता सरकारने त्यांना आरक्षण बहाल करावे, अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यापूर्वीच घेतली आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्रे देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचू शकतो. याबाबत ओबीसी समाजाने जागृत व्हावे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उद्या शुक्रवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजता चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले आहे.
मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे दिल्यास त्याचा सर्व ओबीसी जातीवर परिणाम पडण्याची आणि ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचारविनियम करण्यासाठी या महापंचायतीचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी समाजातील नागरिकांनी या महापंचायतीला उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.
कुणबी समाजाचाही विरोध, शनिवारपासून लाक्षणिक उपोषण
मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात अखिल कुणबी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी शनिवारपासून अखिल कुणबी समाजाने लाक्षणिक उपोषण जाहीर केले आहे. प्रसंगी आक्रमक आंदोलनही उभारले जाईल, असा इशाराही कुणबी समाजाने दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. महाराष्ट्र बंद पुकारला जाईल, असे अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरूषोत्तम शहाणे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शनिवारपासून संघटनेच्या नागपूर येथील जुनी शुक्रवारी परिसरातील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाईल, असेही शहाणे म्हणाले.