पीएच.डी. प्रवेशासाठी आता ‘नेट’ परीक्षा अनिवार्य, देशातील विविध विद्यापीठांच्या पेट परीक्षा रद्दः यूजीसीचा महत्वाचा निर्णय


नवी दिल्लीः देशातील विविध विद्यापीठांकडून पीएच.डी. ला प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘पेट’ परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच ‘नेट’ परीक्षेमार्फतच पीएच.डी.ला प्रवेश देणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहाय्यक प्राध्यापकपदावरील नियुक्तीबरोबरच पीएच.डी. प्रवेशासाठीही नेट अनिवार्य झाली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वर्षातून दोनवेळा जून आणि डिसेंबर महिन्यात नेट परीक्षा घेण्यात येते. सध्या नेट परीक्षेचा स्कोअर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि सहाय्यक प्राध्यापकपदावर नियुक्तीसाठी पात्रतेसाठी वापरण्यात येतो.

दुसरीकडे देशातील विविध विद्यापीठे पीएच.डी.च्या प्रवेशासाठी प्रवेश चाचणी परीक्षा म्हणजेच पेट परीक्षा घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याला पीएच.डी. प्रवेशासाठी अनेक पेट परीक्षा द्याव्या लगतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना एकाच राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश मिळवता यावा यासाठी यूजीसीने नेट परीक्षेच्या तरतुदींचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.

या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे १३ मार्च २०२४ रोजी झालेल्या ५७८ व्या बैठकीत यूजीसीने २०२४-२५  या शैक्षणिक वर्षापासून विविध विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या पेट परीक्षेच्या ऐवजी नेट परीक्षेला मिळालेल्या स्कोअरच्या आधारेच पीएच.डी.ला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

 या निर्णयामुळे जून २०२४ पासून नेट परीक्षेला बसलेले उमेदवार तीन श्रेणींमध्ये पात्र जाहीर करण्यात येणार आहेत. त्या श्रेणी पुढील प्रमाणेः

श्रेणी १:  (i) जेआरएफसह पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र (ii) सहाय्यक प्राध्यापकपदावरील नियुक्तीसाठी पात्र.

श्रेणी २: (i) जेआरएफशिवाय पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र (ii) सहाय्यक प्राध्यापकपदावरील नियुक्तीसाठी पात्र.

श्रेणी ३:  फक्त पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र. जेआरएफ किंवा सहाय्यक प्राध्यापकपदावरील नियुक्तीसाठी अपात्र.

या निर्णयानंतर आता नेट परीक्षेचा निकाल उमेदवाराने पात्र केलेल्या गुणांसह पर्सेंटाइलमध्ये जाहीर केला जाणार आहे. हे गुण पीएच.डी. प्रवेशासाठी वापरात आणले जाऊ शकणार आहेत.

जेआरएफसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोग ( पीएच.डी. पदवीसाठी किमान मानके आणि प्रक्रिया) नियम २०२२ नुसार मुलाखतीच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश दिला जाईल.

श्रेणी दोन आणि तीनमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांच्या पीएच.डी. प्रवेशासाठी ७० टक्के वेटेज हे नेट परीक्षेत मिळवलेल्या गुणांसाठी आणि ३० टक्के वेटेज हे मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांना दिले जाईल. नेट परीक्षेला मिळवलेले गुण आणि मुलाखत/व्हायवामध्ये मिळवलेले गुण याच्या एकत्रित गुणवत्तेच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश दिले जातील.

श्रेणी २ आणि श्रेणी ३ मध्ये उमेदवारांनी नेट परीक्षेत मिळवलेले गुण हे पीएच.डी. प्रवेशासाठी केवळ एकाच वर्षासाठी वैध रहातील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी २७ मार्च रोजी झालेल्या केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!