नांदेड हत्याकांड प्रकरणः बोंढार हवेलीतील गावगुंडांची मालमत्ता जप्त करा- प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी


मुंबईः  गावात भीम जयंतीची मिरवणूक काढल्याचा राग मनात धरून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावातील सवर्ण गावगुंडांनी अक्षय भालेराव या २३ वर्षीय बौद्ध तरूणाची निर्घृणपणे हत्या केल्यामुळे महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेत अक्षय भालेरावच्या खून्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे.

बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातील तलवारी, खंजर घेऊन नाचणाऱ्या सवर्ण गावगुंडांनी गुरूवारी १ जून रोजी अक्षय भालेराव या आंबेडकरी चळवळीत सक्रीय तरूणाची पोटात खंजरचे वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या एवढ्या निर्दयतेने करण्यात आली की, अक्षयचा कोथळा बाहेर पडेपर्यंत हे सवर्ण गावगुंड त्याच्या पोटात खंजरने वार करत राहिले.

अक्षय भालेरावच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. अक्षय भालेराव याचा खून करणाऱ्या दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘नांदेड येथील बोंढार गावात अभय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवच्यावर काळीमा फासणारा आहे. दोषींवर ऍट्रॉसिटी, हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

‘अक्षय भालेराव हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. भालेराव कुटुंबासोबत आणि बोंढार येथील आंबेडकरी समूहासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत,’ असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

वंचित’ची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

अक्षय भालेरावच्या हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड शाखेच्या वतीने सोमवारी ५ जून रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. अक्षय भालेराव हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात येणार आहेत. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता ही निदर्शने होणार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!