‘बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…’ सरपंच हत्याप्रकरणी आ. क्षीरसागरांचे उद्विग्न भाषण; आ. पंडित म्हणाले, त्यांच्या अवयवांचा चेंदामेंदा झाला होता!


नागपूरः नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आज बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी याप्रकरणी आवाज उठवला. वाल्मिक कराडला अटक करा, अशी मागणी आ. क्षीरसागर यांनी केली तर आरोपींना फाशी द्या, अशी मागणी आ. पंडित यांनी केली.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना गाडी अडवून जेव्हा उचलून नेले, तेव्हा त्यांचा सहकारी त्यांच्यासोबत होता. तो सहकारी पोलिस ठाण्यात वारंवार सांगत होता की, सरपंचांना उचलून नेले आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. दोन-तीन तासांनंतर म्हणजे त्या सरपंचांची हत्या झाल्यानंतरच पोलिसांनी हालचाल केली. अत्यंत क्रुरपणे सरपंचाची हत्या करण्यात आली आहे, असे आ. क्षीरसागर म्हणाले.

आरोपीचे नाव वाल्मिक कराड आहे. त्याचे मोबाइल रेकॉर्ड बघितले तर पूर्ण प्रकरण उघड होईल. ६,९ आणि ११ तारखेचे त्याचे सीडीआर रेकॉर्डवर आणावेत. जर वस्तुस्थिती खोटी असेल तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा. वाल्मिक कराडमुळे बीडमध्ये जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे. कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. पण जोपर्यंत हे लोक अटक होणार नाहीत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असे आ. क्षीरसागर म्हणाले.

वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला अटक झालेली नाही. ३०२ च्या गुन्ह्यातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात त्याचे नाव आले पाहिजे. अधिवेशन संपण्याआधी वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. हे लोक इतर सगळे गैरप्रकार करण्यात तरबेज आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा फास्टट्रॅकवर निकाल लागायला हवा, असेही आ.क्षीरसागर म्हणाले.

३०७ चा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा…

बीडमध्ये सर्रास खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बीडमध्ये दोन प्रकार चालू हेत. एकतर गुन्हा खरा असूनही वेळेवर गुन्हा दाखल होत नाही. याप्रकरणात १२ तास उलटल्यानंतर लोक आंदोलनाला बसले तेव्हा गुन्हा दाखल झाला. आणि दुसरे म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणे. ३०७ चा गुन्हा आमच्या जिल्ह्यात चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. बीडमध्ये कुणावर काय होईल आणि कोण काय करेल याचा काहीच नेम नाही, असेही आ. क्षीरसागर म्हणाले. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मार इतका दिला की अवयवांचा चेंदामेंदा झाला

सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर इतका मार दिला गेला होता की पूर्ण चेंदामेंदा झाला होता. बरगड्या, किडनी आणि लिव्हर या सगळ्या अवयावर इतके मारले होते की त्यांचा चेंदामेंदा झाला होता. इतक्या निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली गेली, असे गेवराईचे आ. विजयसिंह पंडित म्हणाले.

गावामध्ये गेल्यावर तिथून पोस्टमार्टेम केलेल्या डॉक्टरांना फोन केला होता. त्यावेळी डॉक्टरांनी संतोष देशमुख यांची बॉडी कशी होती, याबद्दल माहिती दिली, असे आ. पंडित म्हणाले. या प्रकरणामध्ये केज पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो. केज पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात येणे गरजेचे आहे, असे आ. पंडित म्हणाले.

या प्रकरणाचा सोक्षमोक्ष जितक्या लवकर लागेल, त्यामाध्यमातून झालेल्या प्रकारानंतर महायुती सरकार कोणाचीही गय करत नाही, हा संदेश जाईल. ज्यांची चूक केली आहे, त्या आरोपीला अटक होण्यासाठी सभागृहातून निर्देश दिले पाहिजेत. या घटनेतील आरोपींना फाशीसारखी शिक्षा झाली पाहिजे, असेही आ. पंडित म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!