ऐन दिवाळीत आनंदवार्ताः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नॅक  मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची नॅक मूल्यांकनातील ही आजवरची उच्च दर्जाची श्रेणी आहे. नॅकने विद्यापीठाला ४ पैकी ३.३८ जीसीपीए गुणे दिले आहेत. याआधी नॅकने विद्यापीठाला ए श्रेणी दिली होती. यंदाच्या मूल्यांकनात विद्यापीठाची श्रेणी वाढ झाल्यामुळे ऐन दिवाळीत मराठवाड्यासाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.

विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन व संशोधन प्रकल्प, नवकल्पना, पायाभूत सुविधा, इमारती, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यांची नॅकमार्फत दर पाच वर्षांनी तपासणी केली जाते. या तपासणीसाठी नॅककडून पिअर टीम पाठवली जाते. या पिअर टीमच्या सदस्यांद्वारे प्रत्यक्ष तपासणी केली जाते आणि त्यानंतर चर्चा होऊन श्रेणी दिली जाते.

 ‘नॅक पीअर टिम’ ने ’नॅक पिअर टिम’ने २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला भेट दिली होती. नॅकचे संचालक आणि मिझोरम तसेच नॉर्थ हिल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलेल्या प्रा.ए. एन. रॉय यांच्या अध्यक्षतेखालील पीअर टीने दोन दिवसात शैक्षणिक विभाग, धाराशिव (उस्मानाबाद) उपरिसर, विविध संशोधन केंद्राना भेटी दिल्या तसेच विद्यार्थी, संशोधकांशी संवाद देखील साधला होता.

तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ‘नॅक पीअर टिम’ एक्झिट मिटिंग घेतली होती. भेटीच्या अखरेच्या दिवशी गुरुवारी (२४ ऑक्टोबर) महात्मा फुले सभागृहात ’एक्झिट मिटिंग’ घेण्यात आली होती. या बैठकीत डॉ. राय यांनी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्याकडे एक्झिट रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर आज नॅकने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ‘ए प्लस’ श्रेणी दिल्याचे जाहीर केले आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, आयक्यूएसीचे संचालक डॉ. जी.डी. खेडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीम सांघिकरित्या अथक परिश्रम घेतल्यामुळे विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनात वाढ झाली आहे.

डॉ. विजय फुलारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नॅकचे मूल्यांकन करून घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात विद्यापीठाची झालेली शैक्षणिक पिछेहाट पाहता कुलगुरू डॉ. फुलारी यांच्यासाठी विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करणे हे एक मोठे आव्हानच होते. त्यांनी या मूल्यांकन प्रक्रियेत व्यक्तिशः लक्ष घालून सर्व विभागप्रमुख आणि संबंधित विभागांकंडून जय्यत तयारी करवून घेतली.  

कुलगुरू डॉ. फुलारींच्या नेतृत्वातील टीमने विद्यापीठाच्या जमेच्या बाजू स्वयं मूल्यांकन अहवालात (एसएसआर) जोरकसपणे मांडल्या. त्यामुळेच विद्यापीठाला ‘ए प्लस’ श्रेणी मिळाली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात विद्यापीठाला ‘ए’ श्रेणी मिळाली होती. त्यावेळी ४ पैकी ३.२२ सीजीपीए गुण मिळाले होते. यंदाच्या मूल्यांकनात मोठी झेप घेत विद्यापीठाने ‘ए प्लस’ श्रेणी मिळवली आहे. मराठवाड्याच्या उच्च शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

हे होते पीअर टीम सदस्य

 प्रा.ए.एन.राय यांच्या अध्यक्षतेखाली या पीअर टिममध्ये प्रा.विमला एम. या सदस्य समन्वयक होत्या तर प्रा.विशाल गोयल, प्रा. रोव्हरु नागराज,  प्रा.ग्यानेंद्र कुमार रौत, प्रा. साबियासाची सारखेल व प्रा.के.एस.चंद्रशेखर यांचा सदस्य म्हणून समावेश होता.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!