मविआचे भरपावसात राज्यभर निषेध आंदोलन, पुण्यात शरद पवारांचा तर मुंबईत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल


मुंबईः  बदलापूर येथील दोन चिमुरड्या शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर आज शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर भरपावसात काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यात रेल्वे स्थानकाच्या बाहेर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तर मुंबईत दादर येथील शिवसेना भवन परिसरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तोंडाला काळा मास्क आणि दंडावर काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ठाण्यात निषेध आंदोलन करण्यात आले.

पुण्यात शरद पवारांनी महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेवर टिकास्त्र सोडले. आजच्या स्थितीत जे घडले, त्याची राज्य सरकारने गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचे दुःख होतेय की, राज्यकर्ते, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे काही सहकारी म्हणतात की बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण करतायत. मुलीबाळींवरील अत्याचाराबाबत कुणी आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणायचे, हा निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे, याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते, अशा शब्दांत शरद पवारांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. यावेळी शरद पवारांनी सर्व आंदोलकांना महिला सुरक्षेची शपथ दिली.

…ही मोठ्या आंदोलनाची सुरूवातः खा. सुळे

हे सरकार असंवेदनशील आहे. बदलापूरला आलेले लोक बाहेरचे होते, असे सरकार म्हणते. परंतु लोक कोणीही असो, ते भारतीय नागरिक होते आणि भारताच्या लेकीसाठी लढत होते. शेवटी सत्य बाहेर आलेच. तिथले कुणीही बाहेरचे नव्हते. ती बदलापूरची सामान्य जनता होती, जी त्यांच्या लेकीसाठी लढत होती. यातूनच सरकारची विचारसरणी उघड होते. इतके गलिच्छ सरकार मी पाहिलेले नाही, अशा शब्दांत खा. सुप्रिया सुळे यांनी सरकारचा समाचार घेतला.

ही मोठ्या आंदोलनाची सुरूवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपल्याला महिला सुरक्षिततेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेच्या कामाला लागू. जर सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींच्या सुरक्षेची जबाबदारी आपण सगळे घेऊ. मविआचे सगळे पक्ष मिळून ठरवू की प्रत्येक शाळेत जाऊन तिथे सांगू की काही मदत लागली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. राज्यात कुठल्याही लेकीवर अत्याचार होणार नाही, याची जबाबदारी आज आपण घेऊ. बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी होणार नाही, तोपर्यंत मविआचा कोणताही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, असेही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नराधमांना पाठिशी घालणारे सरकारः ठाकरे

मुंबईत दादर येथील शिवसेना भवन परिसरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टिका केली. मला या सरकारची कीव येते. नराधमांच्या विरोधात उभे राहण्याऐवजी ते त्याच्यावर पांघरूण घालण्याचे काम करत आहेत, त्यांना पाठिशी घालत आहेत. त्यांनी नराधमांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी होती. पण ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात, त्यावेळी जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो. आज खरेतर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली. त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक घरात अत्याचार आणि मिंधे सरकारच्या विरोधात मशाल धगधगत आहे. हे आंदोलन थांबता कामा नये. बस डेपो, रीक्षा स्टँड, चौकाचौकात स्वाक्षरी मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. येथे बहिणीवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत. इतके निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पाहिले नव्हते. हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *