
मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर हिमालय घोरपडे दुसऱ्या तर रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
एमपीएससीमार्फत २७ ते २९ मेदरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १ हजार ५१६ उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर गुरूवारी रात्रीच अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रता गुणही जाहीर केले आहेत. हा निकाल समांतर आरक्षणाशी संबंधित मुद्यांसह विविध न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत विजय नागनाथ लमकणे यांनी एकूण ६२४ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यांना मुलाखतीत ५० गुण देण्यात आले. हिमालय बालकृष्ण घोरपडे यांनी एकूण ६१५ गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना मुलाखतीत ५७ गुण देण्यात आले तर ६१३ गुण मिळवून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेले रवींद्र बाळासाहेब भाबड यांना मुलाखतीत ६२ गुण मिळाले आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहीर करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे व कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ता क्रमही बदलू शकतो किंवा उमेदवार अपात्रही ठरू शकतो, असे एमपीएससीने म्हटले आहे.
वैदयकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे एमपीएससीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रक म्हटले आहे.
