एमपीएससीचा पेपर फोडणाऱ्यांची नावे गुणवत्ता यादीत, फडणवीसांनी टोळ्यांची बाजू घेतल्यामुळेच…आ. रोहित पवारांचा गंभीर आरोप


मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोन उमेदवारांची नावे चक्क गुणवत्ता यादीत आली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना धारेवर धरले आहे. पावसाळी अधिवेशनात आपण पेपरफुटीचा मुद्दा मांडला पण फडणवीसांनी पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती, असा गंभीर आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सेवेतील अराजपत्रित गट ब व गट क संवर्गातील पदभरतीसाठी एमपीएससीच्या वतीने ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फोडण्यात आला होता.

या परीक्षेला बसलेला जालना येथील उमेदवार आकाश भाऊसिंग घुनावत (वय २७ वर्षे) याने पुण्याच्या हडपसर येथील जेएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या सेट ‘बी’ प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पायकॅमेराद्वारे जीवन नायमाने या उमेदवाराला पाठवली होती. त्यानंतर जीवन नायमाने या उमेदवाराने ही प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शंकर जारवार या उमेदवाराच्या मोबाईलवर पाठवली होती. या पेपरफुटी प्रकरणी या तिन्ही उमेदवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमपीएससीतर्फे या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या गुणवत्ता यादीत पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल झालेले जीवन नायमाने आणि आकाश धुनावत या दोघांची नावे गुणत्ता यादीत अल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. रोहित पवार यांनी ट्विटरवर या गुणवत्ता यादीचा स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

‘आदरणीय फडणवीस साहेब, पावसाळी अधिवेशन सुरू असताना पेपरफुटीचा मुद्दा मांडला असता आपण त्याकडे दुर्लक्ष करून उलट बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांवर हक्कभंग आणण्याचा इशारा देऊन पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती,’ असा गंभीर आरोप आ. रोहित पवार यांनी फडणवीसांवर केला आहे.

गुन्हा दाखल होताच मंत्रालयातून जातात फोन

‘आपल्या त्याच चुकीमुळे पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि प्रत्येक परीक्षेत या टोळ्या पेपर फोडायला लागल्या. आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होताच मंत्रालयातून त्यांना सोडण्यासाठी फोन जातात. आपल्या त्या एका चुकीचे परिणाम राज्यातील प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत,’ असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पेपर फोडणारेच गुणवत्ता यादीत

आता तर पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची हिम्मत इतकी वाढलीय की ते एमपीएससीचे पेपर फोडायला लागले आहेत आणि त्यांची नावे गुणवत्ता यादीतही यायला लागली आहेत. यासाठी पेपर फोडणाऱ्या टोळ्यांना जबाबदार धरायचे की त्यांना अभय देणाऱ्या सरकारला? असा खोचक सवालही आ. रोहित पवार यांनी केला आहे.

…तर पेपर फोडणाऱ्यांची हिम्मत होणार नाही!

‘शासनाने थोडा गांभीर्याने विचार करावा, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर आपल्या राज्यातही पेपरफुटी विरोधात कडक कायदा आणा. जेणेकरून पेपर फोडण्याची कोणाची हिम्मत होणार नाही,’ असेही आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!