MPSC द्वारे दिव्यांग प्रवर्गातून निवड झालेल्या ४२३ अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?, फेरवैद्यकीय पडताळणीच्या हालचालींना वेग!


मुंबईः प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता दिव्यांग प्रमाणपत्राच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) दिव्यांग प्रवर्गातून निवड झालेल्या राज्यातील ४२३ अधिकाऱ्यांची फेरवैद्यकीय तपासणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने फेरवैद्यकीय तपासणी करावी आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पुण्यातील स्टुडंट्स राइट्स असोसिएशनचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीच्या आधारे आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना पत्र पाठवून दिव्यांग प्रवर्गातून एमपीएससीद्वारे निवड झालेल्या राज्यातील ४२३ अधिकाऱ्यांची फेरवैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या फेरवैद्यकीय तपासणीच्या हालचालींमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास ४२३ अधिकाऱ्यांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दिव्यांग उमेदवाराला सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरी लागत असेल तर त्याची आरोग्य विभागाकडून दिव्यांग तपासणी केली जाते. ही तपासणी झाल्यानंतरच त्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतात. परंतु पूजा खेडकर प्रकरणानंतर दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या संशयित उमेदवारांची चौकशी व्हावी, अशी मागणी स्टुडंट्स राइट्स असोसिएशनने केली होती.

याच मागणीचा आधार घेऊन राज्याच्या आरोग्य सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना पत्र पाठवून या संशयित अधिकारी- कर्मचाऱ्यांची फेरवैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी मागितली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागात दिव्यांग प्रवर्गातून नियुक्त्या मिळवलेले ३५९ अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत शिक्षण विभागात याच प्रवर्गातून नियुक्त्या मिळवलेले ६४ जण असे एकूण ४२३ अधिकारी/कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आता या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून त्यांची फेरवैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ४२३ संशयित व्यक्तींच्या फेरवैद्यकीय तपासणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी स्थानिक पातळीवर उपायजोना करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाइत यांनी सांगितल्याचे ‘मटा’च्या या वृत्तात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *