जामनेरच्या प्रकाशचंद्र जैन आयुर्वेदिक, फिजिओथेरपी व  होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश तडकाफडकी थांबवले, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आदेश


मुंबई:  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेमार्फत चालवण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय, फिजिओथेरपी महाविद्यालय आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा नियम ९४ अन्वये विधानसभेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात  गुरूवारी त्यांनी हे आदेश दिले. आ. विजय शिवतारे यांनी प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या कामकाज संदर्भात अर्धातास चर्चा उपस्थित केली. या चर्चेत आ. अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण, आ. अनुप अग्रवाल आदींनी सहभाग घेतला.

प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या कामकाज संदर्भात सदस्यांनी उपस्थितीत केलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत. या संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी महाविद्यालयासंदर्भातील अनियमित्तेबाबत आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत सात दिवसात चौकशी करून त्याबाबतची सुनावणी घेतली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले.

आरोग्यविज्ञान विद्यापीठाबरोबरच शासन स्तरावरूनही आयुक्त व संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्यामार्फतही चौकशी केली जाईल. या चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!