नवी दिल्लीः आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अखत्यारितील वैद्यीकय समुपदेशन समितीने (एमसीसी) नीट-यूजी २०२४ आणि नीट-पीजी २०२४साठी समुपदेशनाच्या वेळापत्रकाची अधिसूचना अद्यापही काढलेली नाही, असा असा खुलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी केला आहे. हे वेळापत्रक नेमके कधी जाहीर होईल, त्याबाबतच्या संभाव्य तारखाही सांगितल्या आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि सीट मॅट्रिक्स अंतिम केल्यानंतर एमसीसीकडून नीट-यूजी आणि नीट-पीजीसाठी समुपदेशनाचे वेळापत्रक एमसीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाते. २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये नीट-यूजीसाठी अनुक्रमे १९ जानेवारी २०२२, ११ ऑक्टोबर २०२२ आणि २० जुलै २०२३ रोजी सुरू झाले होते, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
२०२४ साठी एनएमसीने जूनच्या अखेरच्या आठवड्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे सीट मॅट्रिक्स अंतिम करण्याबाबतचे वेळापत्रक कळवले होते. त्यानुसार जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पदवी अभ्यासक्रमांसाठी आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीट मॅट्रिक्स अंतिम केले जाईल. त्यानंतर एमसीसीकडून समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या नीट-यूजी परीक्षेमध्ये पेपरफुटीसह अनेक प्रकारच्या अनियमितता झाल्याचे आरोप झाले आहेत. या गैरप्रकारांविरुद्ध काही जणांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही याचिकाकर्त्यांनी संपूर्ण नीट परीक्षाच रद्द करण्याची ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीच्या कामकाजाच्या पद्धतीचीच चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे.बी. पादरीवाला आणि न्या. मनोज मिश्री यांच्या खंडपीठापुढे या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी ८ जुलै रोजी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का खुलासा केला आहे.