छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आंबेडकरवाद हाच खरा राष्ट्रवाद आहे. कौतिकराव ठाले हे स्वीकारतील का? आणि जर का ही राष्ट्रवादी भूमिका ते स्वीकारणार नसतील तर त्यांची ‘महारकी’ आपल्यासारख्या स्वतंत्र बुद्धीच्या पत्रकार-विचारवंतांनी का करायची? असा सवाल आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वात मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या परिवर्तन मंचचे उमेदवार आणि आंबेडकरी कवि-लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी केला आहे. मसाप संस्थासंवर्धक पॅनलचे प्रमुख कौतिकराव ठाले पाटील यांनी ते आंबेडकरवादी असल्याचे जाहीर करावे आणि ‘दलित’ साहित्यिक विचारवंत असलेल्या प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळेंना अध्यक्ष करू असे घोषित करावे मगच आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
मसापच्या कार्यकारी मंडळाच्या पंच वार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वात मसाप संस्थासंवर्धक पॅनल आणि आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक तसेच आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वात परिवर्तन मंच असे दोन पॅनल रिंगणात उतरले आहेत.
डॉ. जिगे यांच्या नेतृत्वातील पॅनलमध्ये प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे, प्रा. डॉ. मोहन सौंदर्य आणि बबन मोरे हे आंबेडकरी कवि-लेखक-प्राध्यापकांची उमेदवारी पाहून ‘मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला?’ या शिर्षकाखाली न्यूजटाऊनने ५ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. न्यूजटाऊनच्या या वृत्तानंतर प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी आपली भूमिका मांडली आणि ‘…नंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या’चे सांगत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
डॉ. जिगे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन मंच पॅनलमध्ये अद्यापही घट्ट पाय रोवून उभे असलेले आणखी एक आंबेडकरी कवि-लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी न्यूजटाऊनचे मुख्य संपादक सुरेश पाटील यांच्या नावे लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. व्हायरल केलेल्या या पत्रात त्यांनी कौतिकराव ठाले-पाटलांना आव्हान दिले आहे. न्यूजटाऊनकडून या पत्राला प्रसिद्धी दिली जाणार नाही, अशी भीती वाटून त्यांनी हे पत्र व्हायरल केले आहे. न्यूजटाऊन नेहमीच निकोप खुल्या चर्चेचा, वाद-प्रतिवादाचा आग्रह धरते. त्यामुळे प्रा. कांबळे यांनी न्यूजटाऊनवर केलेल्या आरोपांसह हे पत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे.
‘मसापच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक ही आंबेडकरवाद विरुद्ध संघ अशी नाही. ही साहित्यिकांची निवडणूक आहे. साहित्य क्षेत्रात कवडीचेही योगदान नसणारा एक व्यक्ती भीतीचे वातावरण निर्माण करतो. व्यक्तीपूजक व अभिव्यक्ति स्वातंत्र्य गहाण ठेवणाऱ्या भित्र्या (मुत्र्या) साहित्यिकाच्या कोऱ्या मतपत्रिका जमा करतो. आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद अनेक वर्षे उपभोगत राहतो. त्याविरुद्धचा एक ‘परिवर्तन’वादी प्रयत्न विविध विचारधारेच्या उमेदवारांनी एकत्र येऊन केला. त्यापूर्वी आम्ही प्रत्येकानी फॉर्म स्वतंत्रपणे भरलेला होता. डॉ. मोहन सौंदर्य यानी परिवर्तन मंचच्या माध्यमातून एकत्र लढूया असे सूचवले आणि वेगवेगळे व स्वतंत्र लढणाऱ्या पंधरा जणांना ते पटले. त्यातून परिवर्तन मंच तयार झाला’, असा दावा प्रा. डॉ. कांबळे यांनी या व्हायरल पत्रात केला आहे.
मसाप संस्थासंवर्धक पॅनलचे प्रमुख कौतिकराव ठाले पाटील हे आंबेडकरवादी आहेत? आजच त्यांनी हे जाहीर करावे आणि ‘दलित’ साहित्यिक-विचारवंत असलेल्या डॉ.ऋषिकेश कांबळे यांना अध्यक्ष करू असे घोषित करावे, मग आम्ही माघार घेऊ, असे खुले आव्हानच प्रा. डॉ. कांबळे यांनी कौतिकराव ठाले-पाटील यांना दिले आहे.
मी कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष होणार आहे किंवा आम्ही एका जेष्ठ साहित्यिकाला अध्यक्ष करणार आहोत, असे ठालेंच्या पॅनलमधील कुण्याही एका उमेदवाराने जाहीर करावे. परिवर्तन मंच त्यांच्या पाठीशी उभा राहील. पण हुजरेगिरी करणाऱ्यांना हे शक्य आहे काय?, असा सवालही ते करतात. मसापच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक ठाले-पाटलांना अध्यक्ष करण्यासाठीच होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
आंबेडकरवाद हाच खरा राष्ट्रवाद आहे. कौतिकराव ठाले हे स्वीकारतील का? आणि जर का ही राष्ट्रावादी भूमिका ते स्वीकारणार नसतील तर त्यांची ‘महारकी’ आपल्यासारख्या स्वतंत्र बुद्धीच्या पत्रकार-विचारवंतानी का करायची?, असेही प्रा. डॉ. कांबळे यांनी या व्हायरल पत्रात म्हटले आहे.
आंबेडकरवादासाठी (राष्ट्रवादासाठी) काँग्रेसी मानसिकता तरी कुठे फायद्याची ठरली? आरएसएस असो की काँग्रेस दोन्हीही राजकीय विचार आंबेडकरवादासाठी मारकच ठरलेले आहेत. गांधी बाबासाहेबांच्या विरोधात नव्हते हे एकवेळ खरे मानले तर नंतरच्या गांधीवाद्यांनी बाबासाहेबांना कुठे स्विकारले?, असा सवाल प्रा. डॉ. कांबळे यांनी केला आहे.
कौतिकराव ठाले-पाटील ज्या विचारधारेचे आहेत तिथे ‘सुंभ जळतो पण पिळ कायम राहतो,’ अशा प्रवृत्तीचा मी व्यक्तीशः धिक्कार करत आलोय. संघाची राष्ट्रविरोधी भूमिका मला जशी मान्य नाही, तशीच मला राष्ट्राला विरोध करणारी गांधीवादी-सामाजवादी भूमिकाही मान्य नाही आणि बाबासाहेबांच्या समर्थकांची राष्ट्रविरोधी भूमिकाही मी मान्य करत नाही. कारण संघ आणि गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा दावाही ते करतात.
विश्व साहित्य संमेलनाच्या तिकिटासाठी ‘महारकी’
नेहमी कौतिकरावांना अध्यक्ष करण्यासाठीच मसापच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक होत आलेली आहे. प्रत्येकवेळी जेष्ठ साहित्यिकांचा अवमान केला जातोय. त्यांना डावलले जातेय. विश्व साहित्य संमेलनाचे तिकीट मिळावे यासाठी झारीतले शंकराचार्य तिथे महारकी करत आहेत. मात्र यावेळी परिवर्तन मंचचे आव्हान ओलांडूनच कौतिकरावांच्या पॅनलला पुढे जावे लागेल, असे प्रा. डॉ. कांबळे यांचे म्हणणे आहे.
आम्ही संघाच्या दांड्यावरचे झेंडे हे ‘न्यूजटाऊन’चे मत विकावू
मसापच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक ही आरएसएस विरुद्ध आंबेडकरवाद अशी नाहीच आहे. ती महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विषारी विंचवाला कसे ठेचायचे यासाठीची आहे. त्याला वेगळे वळण देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून केला जात आहे. मसाप कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. मोहन सौंदर्य, बबनराव मोरे आणि मी डॉ. सिध्दोधन ‘संघाच्या दांड्यावरचे झेंडे आहोत’ हे तुमचे मत दंडेलपणाचे नि विकावू आहे हेच स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रा. डॉ. कांबळे यांना न्यूजटाऊनचे सवाल
- आंबेडकरवाद हाच खरा राष्ट्रवाद असे मानले तर आरएसएसकडून राष्ट्रवादाची जी मांडणी केली जाते, ती प्रा. सिद्धोधन कांबळे यांना मान्य आहे का?
- मसापवर असलेली कौतिकराव ठाले-पाटलांची कथित एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यासाठी आंबेडकरवादी-बहुजन कवि-लेखकांची मोट बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे प्रयत्न का झाले नाही?
- आरएसएसच्या कट्टर स्वयंसेवकाचे नेतृत्व स्वीकाराल्याशिवाय आपण ठाले-पाटलांच्या विरोधात तग धरू शकणार नाही, असे अवसान घातकी दुबळेपण आंबेडकरवादी कवि-लेखकांना का आले?
- मसापची निवडणूक आंबेडकरवाद विरुद्ध आरएसएस नाही, हे प्रा. डॉ. कांबळे यांचे म्हणणे खरे मानले तर मग त्या निवडणुकीचे नेतृत्व आरएसएसच्या स्वयंसेवकाकडेच का? एखाद्या प्रखर आंबेडकरवाद्याकडे का नाही?
- ‘आम्ही संघाच्या दांड्यावरील झेंडे नाहीत,’ आणि ही निवडणूक आरएसएसची नाही असे कांबळे यांचे म्हणणे काहीवेळा पुरते खरे मानले तर साहित्य भारती या आरएसएसच्या साहित्य क्षेत्रातील आघाडीने परिवर्तन मंच पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे, तो परिवर्तन मंच पॅनल किंवा प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळेंनी का नाकारला नाही?
- ही निवडणूक आरएसएसच्या सहभागाशिवाय असेल तर साहित्य भारतीच्या पत्रकातील मुद्दे आणि परिवर्तन मंचच्या जाहिरनाम्यातील मुद्दे सारखेच कसे? म्हणजे परिवर्तन मंच आणि आरएसएसप्रणित साहित्य भारतीचा अजेंडा एकच कसा?
- विश्व साहित्य संमेलनाच्या तिकिटासाठी काही दलित साहित्यिक ठाले पाटलांची ‘महारकी’ करत आहेत, असे प्रा. कांबळे यांचे म्हणणे आहे. मग तुम्ही आरएसएसची ‘यस्करकी’ नेमकी कुठल्या लाभासाठी करायचे ठरवले आहे?
- मसापच्या निवडणुकीत आरएसएसची मदत घेऊ, त्यांची यंत्रणा कुठे आणि कशी वापरता येईल, असे परिवर्तन पॅनलचे प्रमुख डॉ. सर्जेराव जिगेच म्हणतात. या मदतीच्या कुबड्या घेऊन मसापवर गेल्याने आंबेडकरवादाचे नेमके कोणते भले होणार आहे? अशाने ‘संघाच्या कळपातील आंबेडकरवादी कवि-लेखक’ असा जो काही शिक्का बसणार आहे, तो प्रा. डॉ. कांबळे अभिमानाने मिरवणार आहेत का?
तुमच्या पत्रकारितेला बाळशास्त्री जांभेकरांची दुर्गंधी येऊ देऊ नका.आंबेडकरनिष्ठा जोपासून व्यवसाय करा.