छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. गेल्या वर्षभरात आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले. सगळ्या अटी-शर्ती धाब्यावर बसवल्या.एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात केला.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने ४५ हजार कोटींपेक्षा अधिकच्या रकमेची विकास कामे मंजूर केली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
काल संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. आपल्या मराठवाड्यासाठी सरकार काय निर्णय घेणार? हे पाहण्यासाठी सर्वजण या बैठकीकडे डोळे लावून बसले होते. या बैठकीत आम्ही ४५ हजार कोटींपेक्षा जास्त विकासकामे मंजूर केली. यातून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आम्हाला मराठवाड्याची दुष्काळापासीन कायमस्वरुपी सुटका करायची आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजना प्रस्तावित आहे. मागच्या काळात ही योजना मंदावली होती. पण आता आपण यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठवाड्यातील रस्तेही चांगले झाले पाहिजे, यासाठी आपण कोट्यवधी रुपये दिल्याचेही शिंदेंनी सांगितले.
मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही. येथे पश्चिम महाराष्ट्रासारखी सधनता नाही. परंतु मराठवाड्यातील लोकांनी कष्टाने हा प्रदेश फुलवला आहे. त्यांनी आपल्या घामाचे सिंचन केले आहे. पावसाने जरी ओढ दिली असली तरी शेतकऱ्यांचे जेथे नुकसान होईल, तेथे सरकारकडून मदत केली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.