
मुंबईः मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर टीमला मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनात मोठा ट्विस्ट आला असून आता मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वैधानिक मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार असला तरी त्यासाठी मुंबईला वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे सांगत मुंबईतील आंदोलकांना आज दुपारपर्यंत हटवून रस्ते मोकळे करा, असे मुंबई उच्च न्यायालयाने कालच बजावले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीतील अटी-शर्तींचेही उल्लंघन झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन शांततेत नव्हते, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने कालच्या सुनावणीदरम्यान नोंदवले होते.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या आझाद मैदानावर ५ हजार आंदोलकांसह एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतरचे त्यांचे आंदोलन विनापरवानगीच सुरू आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने कालच्या सुनावणीदरम्यान देण्यात आली होती. आझाद मैदानातील अधिसूचित क्षेत्र वगळता मराठा आंदोलक अन्य ठिकाणी कुठेही दिसणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशा सूचना उच्च न्यायालयाने काल राज्य सरकारला दिल्या होत्या.
उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर टीमने काल (१ सप्टेंबर) आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी नव्याने अर्ज केला होता. त्या अर्जावरून मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर टीमला नोटीस बजावून आझाद मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे. मराठा आरक्षण आंदोलकांकडून ११ अटी-शर्तींचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे नमूद करत आंदोलकांनी लवकरात लवकर आझाद मैदान रिकामे करावे, आझाद मैदान पोलिसांनी बजावलेल्या या नोटिशीत म्हटले आहे.
परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करू नये आणि नवी मुंबईतील खारघर पुरतेच हे आंदोलन मर्यादित ठेवण्यात यावे, असे या नोटिशीत बजावण्यात आले असून आंदोलनादरम्यान मराठा आरक्षण समर्थकांकडून अटी-शर्तींचे वारंवार उल्लंघन करण्यात आल्याबद्दल पोलिसांनी जरांगे यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर टीमचे सदस्य किशोर मरकड, पांडुरंग तारक, शैलेश मरकड, सुदाम मुकणे, बाळासाहेब इंगळे, अमोल लहाने, श्रीराम कुरणकर व संजय कटारे यांच्या नावाने आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ही नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाबाबत दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. त्याआधीच मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांना ही नोटीस बजावली आहे. आता मनोज जरांगे पाटील व त्यांची कोअर टीम काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
