सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगेंनाच मराठा नेत्याकडून ‘अल्टिमेटम’, आठ दिवसांत खुलासा न केल्यास दिला विरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा


सोलापूरः मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या, या मागणीसाठी अल्टिमेटम आणि इशारे देऊन राज्य सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनाच बार्शीतील एका मराठा नेत्याने काही प्रश्न उपस्थित करत ‘अल्टिमेटम’ दिला आहे. आठ दिवसांत म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत मनोज जरांगे यांनी या प्रश्नांवर खुलासा न केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही या मराठा नेत्याने दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून या मराठा नेत्याला फुस कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील मराठा नेते अण्णासाहेब शिवाजी शिंदे यांनी डिजिटल फलक झळकवत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाज संभ्रमात पडला आहे, असे म्हणत आगामी विधानसभा निव़डणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी? महायुतीला पाठिंबा द्यावा की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा? असे काही प्रश्न मनोज जरांगेंना विचारणारे डिजिटल फलक मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असणारे मराठा नेते अण्णा शिंदे यांनी लावले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ९ सप्टेंबरपर्यंत या प्रश्नांची उत्तरे दिली नाही तर बार्शीच्या शिवसृष्टीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही अण्णासाहेब शिंदे यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पडले, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यानंतरही कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मराठा समाजाची फसगत होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात गरवंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणयात येईल, असा उल्लेख करण्याचे मान्य करून घ्या, असे अण्णासाहेब शिंदे यांनीया डिजिटल फलकामध्ये म्हटले आहे.

यापूर्वी रझाकारांच्या काळात मराठा- मुस्लिम वाद झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे ३०० हून अधिक ओबीसीबरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे? हेही ठरवा, असेही या डिजिटल फलकात म्हटले आहे. या डिजिटल फलकावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामुळे मात्र अण्णासाहेब शिंदे यांना नेमकी फुस कोणाची? असा सवाल उपस्थित केला जातआहे.

‘आपण एका देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री करणार का? मग की आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात नाही का?’, असा प्रश्न अण्णासाहेब शिंदे यांनी या डिजिटल फलकावर विचारला आहे. त्यामुळे अण्णासाहेब शिंदे यांना हे प्रश्न विचारण्यास फुस कुणी दिली?, असा सवाल केला जात आहे.

मनोज जरांगेनी खुलासा करावा, एक मराठा, लाख मराठाशिर्षकाखाली लावलेल्या या डिजिटल फलकावरील मजकूर जसाच्या तसाः

  • आदरणीय मनोज (दादा) जरांगे पाटील खालील आमच्या शंका दूर करतील का?
  • महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून दादा आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.
  • लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडूनही आणले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
  • मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही.

  • मग दादा आपण भूमिक घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे मान्य आहे.
  • दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे.
  • दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकाराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे ३०० हून अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.
  • नाही तर दादा आपण एका देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?
  • दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहे.
  • अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार?  त्याची जबाबदार निश्चित करा, अन्यथा आपल्यासहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.
  • आदरणीय मनोजदादा तुम्ही आणि मी शंभूराजे युवा क्रांती संघटनेत एकत्र काम केलेले आहे. म्हणून माझ्या शंकांचे समाधान करा, अशी विनंती मी आपणास करत आहे. आपण माझ्या शंकांचे आठ दिवसांत समाधान केले नाही, तर येत्या ९ सप्टेंबरपासून बार्शीतील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा या डिजिटल फलकावर देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!