आरक्षण मिळू दे, तुला कचकाच दाखवतोः बीडमधून मनोज जरांगेंची छगन भुजबळांना धमकी, २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण


बीडः खूप दिवसांपासून तुझी फडफड सुरू आहे. आरक्षण मिळू दे, तुला कचकाच दाखवतो. मी नमुना लई बेक्कार आहे, अशा शब्दात मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बीडच्या इशारा सभेतून जाहीर धमकी दिली. येत्या २० जानेवारी २०२४ पासून मराठा आंदोलक मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाइन संपायला (२४ डिसेंबर) अवघा एकच दिवस शिल्लक असताना आज शनिवारी त्यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली. या सभेत त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत आणि एकेरी शब्दात टीका केली.

भुजबळ हा महाराष्ट्राचा कलंक

जरांगे यांनी भुजबळांचा ‘येवल्याचं येडपट’ असा उल्लेख केला. येवल्याच्या येडपटानं बीडमधील पाहुण्याचे हॉटेल जाळले. सरकारही भुजबळांचे ऐकत आहे. भुजबळांना समज दिल्याचे गिरीश महाजनांनी सांगितले. मी गप्प बसलो. नंतर मी म्हाताऱ्याला काही बोललो नाही. आता येडपट माझी शाळा काडत आहे. याला कुणी मंत्री केले? हा महाराष्ट्राचा कलंक आहे, अशा भाषेत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.

मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर सुट्टी नाही

भुजबळ मराठ्यांच्या वाट्याला कश्याला जातो? तुझ्यात किती दम आहे, हे बघायचे आहे. एकदा आरक्षण मिळू, तुला कचकाच दाखवतो. खूप दिवसांपासून तुझी फडफड चालू आहे. मी नमुना लई बेक्कार आहे. मराठ्यांच्या आक्षणाच्या विरोधात कोणी बोलला तर त्याला सुट्टी देणार नाही, अशा धमकीवजा शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनाही इशारा दिला.

काही न करता गुन्हे लावले

मराठा समाजाने शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केले आहे. आपल्याला डाग लावला गेला. कोणी म्हणते आमची घरे जाळली. कोणी म्हणते आमचे हॉटेल जाळले. पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुंतवलं. आपल्या पोरांनी काही न करताही गुन्हे लावले गेले. जर मराठ्यांना काही करायचे असते तर आज त्यांनी नसते केले का?, असे जरांगे म्हणाले.

मराठ्यांची फसवणूक, अपमान

देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण घेणार. नी काय चूक केली. फक्त मी मराठ्यांच्या पोरांसाठी आरक्षण मागतोय. मराठा पोरांचे मुडदे पडत असताना सरकार झोपेत आहे. सरकार मराठ्यांचा अपमान करत आहे. मराठ्यांची फसवणूक करत आहे. पण सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

…तर सुफडासाफ करू!

सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचे (भुजबळांचे) ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेऊन आरक्षणात आडकाठी आणणार असाल तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेवू नका. नाही तर शांततेत तुमचा सुफडासाफ केला जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

मोठी जात संपवण्याचा घाट…

मराठा समाज पुढील वर्षी म्हणजेच २० जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. मराठा आंदोलक आंतरवाली सराटीतून मुंबईला जातील आणि आझाद मैदानावर आमरण उपोषण करतील. मुंबईला पोहोचलेला मराठा आरक्षण घेऊनच माघारी फिरेल.

 देशातील मोठ्या राज्यातील मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला आहे. परंतु तुम्ही तसे केले तर तुमचे राजकीय अस्तित्वच संपून जाईल. तुम्ही एकदा प्रयोग केला आहे. त्याचे तुम्हाला भोगावे लागत आहे. आज फक्त बीड जिल्हा आहे. नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज घरातून बाहेर पडेल, असे जरांगे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *