
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आज बैठक होत असून ही बैठक रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. भास्कर साठे यांच्या ‘केमिस्ट्री’वरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. याच बैठकीत राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या वर्तनाचा मुद्दाही प्रत्युत्तरादाखल उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारोह येत्या २२ फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या उपस्थितीत होत आहे. या दीक्षांत समारोहाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक आज होत आहे. या बैठकीत दीक्षांत समारोहाच्या तयारीवर चर्चा तर होईलच परंतु त्यापेक्षा या बैठकीला दुसऱ्याच वादग्रस्त मुद्द्याच्या ‘केमिकल’ची फोडणी मिळण्याची शक्यता आहे.
रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. भास्कर साठे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम आणि निकष डावलून रसायनशास्त्राबरोबरच नॅनोटेक्नॉलॉजी या विषयातही पीएच.डी.साठी गाईडशिप (सुपरवायझर) देण्यात आली आहे. डॉ. साठे हे रसायनशास्त्राचे पूर्णवेळ प्राध्यापक असल्यामुळे ते केवळ त्याच विषयात पीएच.डी.साठी मार्गदर्शक होऊ शकतात. परंतु त्यांना नॅनोटेक्नॉलॉजी या विषयातही पीएच.डी.साठी गाईडशिप देण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर २०२४ मध्ये घेतलेल्या पेट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने अन्य विषयांबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील पीएच.डी. च्या विषयनिहाय रिक्त जागा आणि मार्गदर्शकांची प्रमाणित यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यातून डॉ. भास्कर साठेंचा हा ‘केमिकल लोचा’ न्यूजटाऊनने उघडकीस आणला आहे. त्यावरून आज होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ विकास मंचचे व्यवस्थापन परिषद सदस्य या मुद्द्यावरून विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
…मग २०१८ च्या यादीत साठेंचे नाव का नाही?
डॉ. भास्कर साठे हे आपण २०१४ पासूनच रसायनशास्त्र आणि नॅनोटेक्नॉलॉजी या दोन्ही विषयात पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून काम करत असल्याचा दावा करत आहेत. आपले दोन्ही विषयात पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून सुरू असलेले काम नियमाप्रमाणेच असल्याचाही त्यांचा दावा आहे. परंतु २०१८ मध्ये विद्यापीठाने पीएच.डी.च्या प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली होती. त्यावेळी विषयनिहाय रिक्त जागा आणि मार्गदर्शकांची प्रमाणित यादी जाहीर करण्यात आली होती.
२०१८ च्या यादीत नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या मार्गदर्शकाच्या यादीतून डॉ. भास्कर साठे यांचे नाव वगळण्यात आले होते. या विषयाला अन्य मार्गदर्शकच नसल्यामुळे २०१८ मध्ये नॅनोटेक्नॉलॉजी विषयाची पेटच घेण्यात आली नव्हती. डॉ. भास्कर साठेंच्या दाव्यानुसार त्यांचे दोन विषयात पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून सुरू असलेले काम यूजीसीच्या नियमानुसारच असेल तर २०१८ मध्ये पेटच्या वेळी त्यांचे नाव का वगळण्यात आले होते?, हा कळीचा मुद्दा आहे.
एकट्या ‘केमिस्ट्री’लाच १६ लघुसंशोधन प्रकल्प कसे?
व्यवस्थापन परिषदेच्या आज बैठकीत विद्यापीठाने दिलेल्या लघुसंशोधन प्रकल्पाच्या मुद्यावरूनही वादळी चर्चेची शक्यता आहे. विद्यापीठाने विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांना जानेवारी महिन्यात लघुसंशोधन प्रकल्प दिले आहेत. या लघुसंशोधन प्रकल्पांपैकी २८ लघु संशोधन प्रकल्प विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेला देण्यात आले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत एकूण १८ विषय आहेत. परंतु एकट्या रसायनशास्त्र या विषयाला २८ लघुसंशोधन प्रकल्पांपैकी तब्बल १६ लघुसंशोधन प्रकल्प देण्यात आले आहेत. एकट्या रसायनशास्त्र विषयावरच एवढे ‘प्रेम’ आणि अन्य विषयांना सापत्न वागणूक का?, असा सवाल करत आजच्या बैठकीत या मुद्यावरूनही व्यवस्थापन परिषद सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.
डॉ. सानपांच्या ‘वर्तणुकी’वरून पलटवार शक्य
विद्यापीठ विकास मंचचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भास्कर साठेंच्या ‘केमिस्ट्री’वरून विद्यापीठ प्रशासनाला घेरण्याच्या तयारीत असतानाच विद्यापीठ उत्कर्ष पॅनलशी संबंधित व्यवस्थापन परिषद सदस्यांकडून राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या वर्तणुकीचा मुद्दा उपस्थित करत पलटवार करण्याची शक्यता आहे.
डॉ. सानप यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना अरेरावी करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. या मुद्यावरून काही व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे आधीच डॉ. सानप यांची तक्रार केली आहे आणि त्यांचे नामनिर्देशत परत घेण्याची विनंती केली आहे. आजच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.
