राज्यपाल कोश्यारींची आक्षेपार्ह वक्तव्ये काही नवीन नाहीत. दर पंधरा-वीस दिवसाला एकतर त्यांचे एखादे रंजक-आक्षेपार्ह वक्तव्य येते किंवा बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत किंवा अन्य मॉडेल्ससोबत त्यांचे फोटो तरी दिसायला लागतात. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपेक्षाही कोश्यारीच जास्त हेडलाइनचा विषय बनले आहेत.
नवी दिल्लीः छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरूषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून खरे तर आता भाजपलाही सुटका हवी आहे, परंतु राजकारणाचे पक्के खेळाडू असलेल्या कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याच कोर्टात चेंडू टाकत ‘उचित मार्गदर्शन’ मागितल्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.
साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी मागील दोन आठवड्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. उद्यनराजेंनी ३ डिसेंबर रोजी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेतला आणि राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी केली. मागच्या ९ डिसेंबरला त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वेगवेगळी निवेदने देऊन कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
राजकीय दृष्टीने पाहिले तर उदयनराजेंची ही कोश्यारींविरुद्धची आघाडी छोटीशी घटना नाही. स्वतःला अनुशासित राजकीय पक्ष म्हणवणारी भाजप अशा प्रकरणात तत्काळ कारवाई करते. परंतु उदयनराजेंच्या बाबतीत तसे न होता त्यांना खुली सूट देण्यात येऊ लागली आहे. कोश्यारींच्या विरोधात जे काही बोलायचे आहे ते बोलून घ्या, असेच जणू भाजपला सूचित करायचे असावे.
उदयनराजे भोसले यांची विधाने पहाता आता भाजपलाही राज्यपाल कोश्यारी यांच्यापासून सुटका हवीच आहे, असेच एकंदर चित्र आहे. परंतु कोश्यारीही राजकारणातील पक्के खेळाडू आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच पत्र लिहून आपली भूमिका मांडली आणि ‘उचित मार्गदर्शन’ करावे, असा आग्रह धरला आहे. कोश्यारींनी मागितलेले हे ‘उचित मार्गदर्शन’च भाजपच्या अडचणीत भर घालणारे ठरण्याची शक्यता आहे.
भाजपला महाराष्ट्रात सत्तेचे राजकारण करायचे असल्यामुळे उदयनराजेंकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही. उदयनराजे हे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.
औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोश्यारींच्या हस्ते मानद डी.लिट. प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना कोश्यारींनी ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श है’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. कोश्यारींच्या या वक्तव्यावर या दोघांनीही या कार्यक्रमात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र नंतर शरद पवारांनी हा छत्रपतींचा अपमान असल्याचे सांगत हा मुद्दा केला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या.
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात कोश्यारींच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आंदोलने सुरू आहेत. तरीही भाजप पक्षश्रेष्ठी बघ्याच्या भूमिकेत होती. परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूसही कोश्यारींच्या वक्तव्यामुळे नाराज आहे, हे भाजपच्या लक्षात येताच या एकूणच प्रकरणात मागच्या आठवड्यात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची एंट्री झाली आहे. हे राजकारण समजून घेणे तसे फारसे अवघड नाही.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना जो सन्मान आहे, त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचे राजकीय दुकान चालवू शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भाजपलाच आता राज्यपाल कोश्यारींपासून सुटका करून घ्यायची आहे. कोश्यारींनी स्वतःच राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा, अशी भाजपची इच्छा आहे. परंतु कोश्यारी तसे करण्याची काही शक्यता दिसेनाशी झाली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. त्यात त्यांनी ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून दाखवण्यात आल्याचा’ आरोप केला आणि आपणच मला ‘उचित मार्गदर्शन’ करावे, असा आग्रहही धरला आहे.
खरेतर राज्यपाल कोश्यारी हे राष्ट्रपतींनाही पत्र लिहून त्यांचे मार्गदर्शन मागू शकले असते. परंतु त्यांनी तसे न करता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सल्ला मागितला आहे. यातून राज्यपाल कोश्यारींना भाजप पक्षश्रेष्ठींची भूमिका जाणून घ्यायची आहे, असेच यातून दिसते आहे. सद्यस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच भाजप पक्षश्रेष्ठी आहेत. त्यामुळे कोश्यारींनी ‘योग्य ठिकाणी’ सल्ला मागितलेला असला तरी त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी जाळ्यात अडकण्याचीच जास्त शक्यता आहे.
कारण, नाराज होऊन कोश्यारी उत्तराखंडला परत गेले तर राजकारण करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे कोश्यारींना नेमके कसे आणि कुठे ‘सामावून’ घ्यायचे, यावरच भाजप पक्षश्रेष्ठी चिंतन करत असण्याची शक्यता आहे. कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटावेच लागेल, हे उदयनराजे यांनी घेतलेल्या ‘भाजपपुरस्कृत’ भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे, मात्र त्यांच्या ‘सन्मानपूर्वक निरोपा’चा पर्याय शोधला जात आहे.
राज्यपाल कोश्यारींची आक्षेपार्ह वक्तव्ये काही नवीन नाहीत. दर पंधरा-वीस दिवसाला एकतर त्यांचे एखादे रंजक-आक्षेपार्ह वक्तव्य येते किंवा बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत किंवा अन्य मॉडेल्ससोबत त्यांचे फोटो तरी दिसायला लागतात. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपेक्षाही कोश्यारीच जास्त हेडलाइनचा विषय बनले आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळले तर येथे पैसेच उरणार नाहीत. मग मुंबईला आर्थिक राजधानीही म्हटले जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला.
एकनाथ शिंदे सरकारच्या स्थापनेतही राज्यपाल कोश्यारींची मोठी भूमिका आहे. त्याहीवेळी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हाही कोश्यारींची भूमिका संशयास्पद वादग्रस्तच राहिली आहे. भाजपने नियुक्त केलेल्या वादग्रस्त राज्यपालांची जेव्हाजेव्हा यादी तयार केली जाते तेव्हा केरळच्या राज्यपालांच्या वर महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींचेच नाव येते. अश्या ‘किर्तीवंत’ राज्यपालांना ‘सन्मानपूर्वक निरोप’ कसा द्यायचा? हाच सध्या भाजप पक्षश्रेष्ठींपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे.