पोलीस पाटलांना मानधनवाढ, ग्रामपंचायतीत बसण्याची जागा; सरकार म्हणाले…


मुंबई: ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी  लवकरच शासकीय समितीची  बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन ३ हजार होते. ते सन २०१९ मध्ये वाढवून ६ हजार ५०० इतके करण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडवण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले.

पोलीस पाटील यांच्या नियुक्तीच्या नुतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पूर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नुतनीकरणाचा कालावधी हा १० वर्षाचा करण्यात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

 ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात येईल. ‘कोविड’ काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *