मुंबईः राज्यात सुरू करण्यात आलेली ‘एक राज्य एक गणवेश’ योजना सुसूत्रतेअभावी फसल्यामुळे राज्य सरकारने आता या योजनेत मोठा बदल केला आहे. यापुढे मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांअंतर्गत सरकारी तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश देण्यात येतात. २०२३-२४ पासून दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनाही राज्य योजनेतून मोफत गणवेश देण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत देण्यात येणारे गणवेश अर्धे सत्र संपल्यानंतरही अनेक शाळांना मिळालेच नाहीत. काही विद्यार्थ्यांना मापापेक्षा मोठे गणवेश मिळाले. मोफत गणवेश योजनेत आलेल्या या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि शिक्षक संघटनांनी मोफत गणेवश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीनेच देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे मोफत गणवेश योजनेची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय २० डिसेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे.
मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. त्यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी. मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.
कसे असतील नवे गणवेश?
- ‘एक राज्य एक गणवेश’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट/पँट अशी असणार आहे.
- विद्यार्थिनींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद मिळ्या रंगाचा पिनो-फ्रॉक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट अशी असणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार-कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार आणि आकाशी रंगाचा कमीज असा गणवेश असेल, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.