वरळीत आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून तगडे आव्हान, माजी मंत्री मिलिंद देवरांना निवडणुकीच्या रिंगणात


मुंबईः वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांना तगडे आव्हान देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आखली असून आदित्य ठाकरेंच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. त्यामुळे ही कांटे की लढत होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनाही शिवसेनेत घेण्यात आले होते. त्यातच त्यावेळी शिवसेना- भाजप युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंना पहिली विधानसभा निवडणूक तुलनेने सोपी गेली होती.

यावेळच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र मात्र वेगळे असणार आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने वरळीमधून यंदा संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे.

मिलिंद देवरा यांनी एक्स या मायक्रोब्लॉलिंग सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपण वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले आहे. ‘वरळी आणि वरळीकरांना न्याय मिळणे प्रलंबित आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटते. आता आम्ही सगळे मिळून पुढील मार्ग प्रशस्त करत आहोत आणि लवकरच आमचा दृष्टिकोन जाहीर करू. आता वरळीची वेळ आहे!’ असे देवरा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती, परंतु त्याआधीच राज्यसभेवर त्यांची वर्णी लावण्यात आली.

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांना केंद्रात मंत्रिपदही देण्यात आले होते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता.

वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातच येतो. या मतदारसंघात देवरा यांना मानणारा एक वर्ग आहे. या मतदारसंघातील अमराठी मतांवरही त्यांची पकड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे देवरा यांच्या उमेदवारीमुळे आदित्य ठाकरे यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी जाणार नाही.

थेट जय शाहांनाच उभे कराः राऊत

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी दिली जाण्याच्या चर्चेवर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनीच आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीतून उभे रहावे किंवा दिल्लीतून उमेदवार आणावा. हा मतदारसंघ एवढाच महत्वाचा असेल तर थेट जय शहा यांनाच येथून उभे करावे, असे राऊत म्हणाले. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!