नांदेड: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात येत चालली असतानाच मराठवाड्यात ओबीसी विरुद्ध मराठा वादाला हिंसक वळण लागले आहे. नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची गाडी अडवून घोषणाबाजी करत दगडफेक केली. कंधार तालुक्यातील बचोटी गावात गुरूवारी रात्री हा प्रकार घडला.
लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके हे कंधार तालुक्यात आले होते. प्रचारसभा संपवून ते परत जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत रस्त्यावर उतरलेल्या असंख्य मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.
मराठा आंदोलकांना प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलकही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषण केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. आता लक्ष्मण हाके हे ओबीसी उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
प्रचारसभा झाल्यानंतर आम्ही परत येत असताना १०० ते १५० तरूण रस्त्यावर आले. त्यांनी चेहरे झाकलेले होते. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या होत्या आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्यासोबत लोहा मतदारसंघातील उमेदवार होते. हे तरूण गाडीवर चढले आणि त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू केली. या तरूणांनी जरांगे पाटलांच्या घोषणा दिल्या, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
जेव्हा आम्ही गाडी थोडी पुढे घेतली तेव्हा त्यांनी मागून माझ्या गाडीवर दगडफेक केली. ज्यात गाडीच्या काचा फुटल्या. आमच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आमच्यावर भ्याड लोकांनी हल्ला केला, असे म्हणत तोंड बांधून काय हल्ला करता? हल्ला करायचा असेल तर समोरासमोर या, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिले आहे.
आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही ओबीसींच्या बाजूने बोलायचे नाही का? आम्ही निवडणुकीला उभे रहायचे नाही का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिले जाणार आहे की नाही? असे सवाल करत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील व्यक्ती निवडणुकीला उभा राहिलेला आवडत नाही. राज्यातील ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला.