जालनाः जालना विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या सोबत फोटो काढत असताना भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला थेट लाथ मारून बाजूला केले. रावसाहेब दानवे कार्यकर्त्यावर लाथ झाडतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ‘भाजपमध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्याची हीच किंमत आहे का? असा सवाल करत लोकसभेचा माज अजून उतरलेला दिसत नाही,’ अशी टीका विरोधकांनी केली आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवेंचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. दानवे हे कोणत्या कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे वाद ओढवून घेतात तर कधी गावठी अंदाजामुळे चर्चेत येतात. आता त्यांनी फोटोमध्ये येणाऱ्या एका कार्यकर्त्याला थेट लाथ मारल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जालना विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. भेटीसाठी आलेल्या आलेल्या अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवे यांनी शाल आणि पुप्षगुच्छ देऊन सत्कार केला. हा सत्कार करत असताना फोटो काढले जात होते. फोटो काढत असताना एक कार्यकर्ता रावसाहेब दानवे यांच्याजवळ होता आणि तो फोटोत येत होता. हे लक्षात येताच रावसाहेब दानवे यांनी मागचा पुढचा विचार न करता उजवी लाथ उचलली आणि ती उलटी लाथ थेट त्या कार्यकर्त्याला मारली.
रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला उलटी लाथ मारल्याचा हा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ एका प्रचारसभेत दाखवला आणि अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही, असे टिकास्त्र सोडले. २० तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडीओ लक्षात ठेवा, असेही अंधारे म्हणाल्या.
दानवे यांच्या लाथ मारण्याच्या कृतीवर सार्वत्रिक टिका होत आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्यांची किती इज्जत आहे, हे रावसाहेब दानवे यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
‘हा माज बरा नव्हे.. फोटो काढताय तो पण तुम्ही एका गद्दारासोबतच हे लक्षात ठेवा.. सामान्य जनतेला अशी लाथ मारणे चांगले नाही. लोकसभेचा माज अजून उतरलेला दिसत नाही…’अशी टिका महाविकास आघाडीच्या एक्स हँडलवरून करण्यात आली आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पहा व्हिडीओ