छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांकडून राज्यात मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात असतानाच या आरोपाला पुष्टी देणारा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पैसे वाटप करणारे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांना मतदान करण्यास सांगत आहेत. एका मतासाठी ५०० रुपयांचा रेट ठरवण्यात आल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
या व्हिडीओत काही लोक बसलेले दिसत आहेत. यातील एक व्यक्ती धनुष्यबाणालाच म्हणजे संजय शिरसाट हे निवडून आल्यावर तुमच्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटवतो, असे आश्वासन देत आहे. तर दुसरी व्यक्ती ‘तुमची मते किती आहेत?’ असा प्रश्न विचारताना दिसत आहे. समोरून एक व्यक्ती ‘८ मते’ असे सांगताना ऐकू येत आहे. त्यावर ‘हे घे ४ हजार रुपये’ असे म्हणत खिशातून पैसे काढून देतो आणि ‘धनुष्यबाणाला मतदान कर, तीन नंबरला आहे बरं का’ असे पैसे देणारी व्यक्ती सांगताना दिसत आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील देवळाई तांडा भागातील हा व्हिडीओ आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘यापेक्षा निवडणूक आयोगाला मोठा पुरावा कोणता हवा! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?’ असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजू शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. एकास एक होत असलेली ही लढत अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होत असून संजय शिरसाट यांच्यासमोर राजू शिंदे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांचे स्थान डळमडळीत झाल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पहायला मिळत आहे.
पोलिसांच्या देखरेखीखाली पैसे वाटपः दानवे
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाता पोलिसांच्या देखरेखीखाली पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलतना दानवे म्हणाले की, पोलिस यंत्रणेच्या देखरेखीखाली पैसे वाटपाचे काम सरू आहे. मग निःपक्षपातीपणे निवडणूक कशी होईल? संभाजीनगरचे पोलिस निःपक्ष आहेत का? संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा सर्व प्रकार सुरू आहे, निवडणूक आयोग याची दखल घेणार का? असा सवालही दानवे यांनी केला आहे.
प्रत्येक मतासाठी एक हजार ते दोन हजार रुपये देण्याचा प्रकार सुरू आहे. दहा ते वीस प्रभागात एख ते दोन हजार रुपयांप्रमाणे आधार कार्ड जमा करण्यात आले आहेत. हजार मतदारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे पैसे वाटण्यात आले आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला आहे.