
मुंबईः राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून परळीला देश पातळीवरील मोठा बहुमान मिळाला आहे. परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच अनोखे व आगळे वेगळे असे देश पातळीवरील भव्य पशुपक्षी प्रदर्शन भरणार आहे. देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो हा परळीसाठी ऐतिहासिक बहुमान ठरणारा आहे.
राज्यातील पशुपालकांसाठी आणि कृषी क्षेत्राशी निगडित पशुसंवर्धन उद्योगांसाठी एक मोठी उपलब्धी म्हणून परळी वैजनाथ येथे १० ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘महापशुधन एक्स्पो-२०२५’ हे देशपातळीवरील पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी शासनाने ५ कोटी ८४ लाख रूपये मंजूर केले असून याबाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे.
भारतीय पशुधन क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे असून भारतात ११.६ टक्के पशुधन आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. महाराष्ट्रात पशुपालनातून शेतकऱ्यांना हमीपात्र उत्पन्न मिळत असून, ज्या भागात हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो, त्या भागात आत्महत्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे आढळून आले आहे.
राज्याच्या विकासात विदर्भ व मराठवाडा या भागांचा सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाटा कमी असल्याने तेथील शेतकऱ्यांना व पशुपालकांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून परळीत अखिल भारतीय पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अखिल भारतीय पशुप्रदर्शन पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी प्रेरणा देणार आहे.
या प्रदर्शनात राज्यातील आणि राज्याबाहेरील देशभरातून विविध जातींचे जातीवंत व उत्कृष्ट पशुधन प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील व्यावसायिक, तज्ज्ञ आणि विविध संस्थांचे स्टॉल्स लावले जाणार असून अद्ययावत तंत्रज्ञान, उपकरणे आणि नव्या संधींची माहिती पशुपालकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी पशुसंवर्धन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. परळी वैजनाथ येथे होणारा हा ‘महापशुधन एक्स्पो-२०२५’ राज्यातील पशुपालक, उद्योग, संशोधक आणि सामान्य नागरिकांसाठी एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.
