२५ कोटी रुपये खर्चून होणार पैठणच्या श्री महानुभाव दत्त मंदिराचा विकास, आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचे महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या श्री महानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचे बुधवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण झाले. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५ कोटी रुपयांच्या आराखड्यात काही बदल सूचवत मान्यता देण्यात आली आणि सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासमोर हे सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,  जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शेवलीकर आदी जिल्हा मुख्यालयातून उपस्थित होते.

श्री महानुभाव दत्त मंदिर ट्रस्ट हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी यांच्याशी संबंधित आहे. ११८९ च्या सुमारास चक्रधर स्वामी या भागात वास्तव्यास होते. श्री स्वामी त्र्यंबकेश्वर ते राहेर या समग्र गोदावरी काठी विहार करीत. येथेच त्यांनी आपल्या अनुयायांना उपदेश केले. त्यामुळे हे स्थळ महानुभाव पंथियांसाठी महत्त्वाचे आहे.

या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला.  त्यात भक्तनिवास, सभागृह, ग्रंथालय, स्वच्छता गृह, वाहनतळ व परिसर सुशोभिकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. या आराखड्यात मुख्यसचिव श्रीमती सौनिक यांनी व समिती सदस्यांनी काही फेरबदल सूचविले. पर्यावरणपूरक रचना व सौर उर्जेचा अधिकाधिक वापर, तसेच वृक्ष लागवड, पदपथ आदी दुरुस्त्या सूचवण्यात आल्या. त्यानुसार आराखडा सुधारित करुन पुन्हा सादर केला जाईल. या संदर्भात १० मेनंतर पुढील बैठकीत अंतिम निर्णय होईल,असे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!