मुंबईः निवडणुकांसाठी होणाऱ्या आघाडी किंवा युतीमध्ये सहमतीने निर्णय होतो तो जागावाटपाचा. एकदा कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा हे सूत्र ठरले की त्या त्या पक्षाकडून आपापले उमेदवार निश्चित केले जातात. परंतु भाजपच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश असलेल्या महायुतीत तसे होताना दिसत नाही. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार निश्चितीत भाजपने थेट हस्तक्षेप सुरू केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपशी झुंज द्यावी लागत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपने अवलंबलेला हा हस्तक्षेपाचा पॅटर्न आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला तर आपली खैर नाही, या धास्तीने शिंदे गटातील शिवसेना आमदारांत आतापासूनच चलबिचल सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले उमेदवार बदलण्यासाठी भाजपकडून दबाव आणला जात असल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात कमालीची अवस्थता पसरली आहे.
भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत आपल्या गटात असलेल्या १३ विद्यमान खासदारांचे मतदारसंघ वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपशी कमालीची झुंज द्यावी लागत आहे. अतिरिक्त मतदारसंघ पदरात पाडून घेणे तर दूरच पण सोबत आलेल्या खासदारांचे मतदारसंघच वाचवणे शिंदे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू पहात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कल्याण आणि ठाणे मतदारसंघाबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. भाजपने या दोन्ही मतदारसंघांवर दावा केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना आपले सुपुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचीच अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर करता आलेली नाही.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते लोकसभेच्या २२ जागांवर ठाम होते. २२ जागांपेक्षा एकही जागा कमी घेणार नाही, असा शिंदे गटातील नेत्यांचा सूर होता. मात्र भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी डोळे वटारल्यानंतर लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिंदे गटाने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसू लागले आहे.
लोकसभेच्या २२ जागा तर सोडाच परंतु उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आलेल्या १३ खासदारांचे मतदारसंघ सुरक्षित ठेवून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यातही एकनाथ शिंदे यांना अपयश आले आहे. भाजपने टाकलेल्या दबावामुळे शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना डावलावे लागले आहे. भाजपच्या सांगण्यावरून शिंदे गटाला रामटेकमध्ये काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांना उमेदवारी द्यावी लागली आहे.
जागा द्या किंवा आम्ही सांगतो तोच उमेदवार
शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे महत्वाचे लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपशी लढावे लागत आहे. ठाणे किंवा कल्याण या दोन मतदारसंघांपैकी एक जागा आम्हाला द्या, असा भाजपचा आग्रह आहे. हे दोन्ही मतदारसंघ मिळणार नसतील तर ठाणे मतदारसंघात भाजप सांगेल तोच उमेदवार द्या, अशी अट भाजपने ठेवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपने घातलेल्या या अटीमुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. ठाण्याचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आले आहेत. ते शिंदे गटात असले तरी त्यांचा ओढा भाजपकडेच असल्याचे सांगितले जाते. पालघरच्या जागेवरही भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळेही शिंदे गटाची चांगलीच अडचण झाली आहे.
उमेदवारी नव्हे तर मतदारसंघ राखण्यासाठीच धडपड
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. आता हेमंत गोडसे यांची उमेदवारी तर सोडाच परंतु हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठीच शिंदे गटाला धडपड करावी लागत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी जाहीर व्हावी, म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केले. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, गोसडे आणि नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठाण मांडूनही नाशिकची जागा शिंदे गटाकडून हिसकावून घेतली जात असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
गोडसेंना उमेदवारीची शक्यता मावळली
नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण लढावे, असा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गटाकडून हिसकावून ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पूर्णतः मावळली आहे.
हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर टांगती तलवार
शिंदे गटाच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. हिंगोलीचा उमेदवार बदला किंवा ही जागा आम्हाला द्या, यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंवर प्रचंड दबाव आहे. या दबावामुळे कोणत्याही क्षणी हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याची शक्यता बळावली आहे.
भावना गवळी अधांतरी
यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी देण्यास भाजप अनुकूल नाही. त्यामुळे भावना गवळी यांची उमेदवारीही अधांतरीच आहे. त्यांनीही मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन केले, मात्र भाजपच्या हस्तक्षेपामुळे त्यांचीही उमेदवारी अद्याप जाहीर होऊ शकलेली नाही.
भाजपच्या कलानेच सर्व निर्णय
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघही शिंदे गटाच्या हातातून जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार दिला जाईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्याच दबावामुळे शिंदे गटाला धाराशिवची (उस्मानाबाद) जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी लागली आहे. साताऱ्याची जागा राखण्यासाठी भाजपने नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शिंदे गटाला गमावाव्या लागल्या आहेत. लोकसभा मतदारसंघांचे वाटप भाजपच्याच कलाने होत आहे. ते पाहून शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
‘भाजप पॅटर्न’मुळे आमदारांत चलबिचल
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निश्चित करताना भाजपकडून एक तर आम्हाला जागा सोडा, नाही तर आम्ही सांगतो तोच उमेदवार द्या, असा ‘हस्तक्षेप पॅटर्न’ राबवण्यात येत असल्याचे पाहून शिंदे गटाच्या विद्यमान आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीत राबवण्यात येत असलेला ‘पक्ष तुमचा, उमेदवार आमचा’ हा पॅटर्न आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवल्यास आपल्या उमेदवारीचे काय? या भीतीने शिंदे गटाचे विद्यमान आमदार चांगलेच धास्तावले आहेत.
मोठ्या राजकीय उलथापालथीची चिन्हे
या लोकसभा निवडणुकीत भाजप जर जागा द्या किंवा आम्ही सांगतो तोच उमेदवार द्या असे सांगत दबाव आणून हवे ते करून घेत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कित्ता गिरवण्यात आल्यास आपलाही पत्ता कट होण्याची शक्यताच अधिक आहे, असे शिंदे गटातील बहुतांश आमदारांना वाटू लागले आहे. शिंदे गटात पसरलेली ही अस्वस्थता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ही अस्वस्थता दूर करण्यात शिंदेंना अपयश आले तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ पहायला मिळण्याची शक्यता आहे.