पालकमंत्र्यांची यादी जाहीर, कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे? बीडचा पालकमंत्री कोण? धनंजय मुंडेंचा पत्ता कट;  वाचा संपूर्ण यादी


मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेली पालकमंत्रिपदाची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट करण्यात आला असून पंकजा मुंडे यांना मात्र लॉटरी लागली आहे. त्यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

तीन जिल्ह्यात पहिल्यांदाच सहपालकमंत्री नेमण्यात आले आहेत. कोल्हापूर, मुंबई उपनगर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी सहपालकमंत्री नेमण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली नाही. मुंडेंकडे बीडचे पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातीलच आमदारांनी विरोध केला होता. त्यामुळे धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आले असून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेचे भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबतची अपेक्षा त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली होती. परंतु त्यांची अपेक्षा फलद्रुप झाली नाही. आदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

  • गडचिरोलीः देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
  • नागपूर, अमरावतीः चंद्रशेखर बावनकुळे
  • पुणे, बीडः अजित पवार
  • ठाणे, मुंबई शहरः एकनाथ शिंदे
  • मुंबई उपनगरः आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
  • जालनाः पंकजा मुंडे
  • नांदेडः अतुल सावे
  • लातूरः शिवेंद्रसिंह राजे भोसले
  • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): संजय शिरसाट
  • धाराशिव (उस्मानाबाद):  प्रताप सरनाईक
  • हिंगोलीः नरहरी झिरवाळ
  • परभणीः मेघना बोर्डीकर
  • अहिल्यानगर (अहमदनगर): राधाकृष्ण विखे पाटील
  • नाशिकः गिरीश महाजन
  • वाशिमः हसन मुश्रीफ
  • यवतमाळः संजय राठोड
  • सांगलीः चंद्रकांत पाटील
  • जळगावः गुलाबराव पाटील
  • रत्नागिरीः उदय सामंत
  • धुळेः जयकुमार रावल
  • चंद्रपूरः अशोक उईके
  • साताराः शंभुराज देसाई
  • रायगडः आदिती तटकरे
  • सिंधुदुर्गः नितेश राणे
  • नंदूरबारः माणिकराव कोकाटे
  • सोलापूरः जयकुमार गोरे
  • भंडाराः संजय सावकारे
  • बुलढाणाः मकरंद जाधव
  • अकोलाः आकाश फुंडकर
  • गोंदियाः बाबासाहेब पाटील
  • कोल्हापूरः प्रकाश आबिटकर, सहपालमंत्री माधुरी मिसाळ
  • वर्धाः पंकज भोयर
  • पालघरः गणेश नाईक

यादी जाहीर होताच धनंजय मुंडे म्हणाले…

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्ह्यातील सध्या सुरू असलेली सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपणच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मला न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे, अशी विनंती केली होती. सद्यस्थितीत मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ नये, याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार. आपल्यावर देण्यात आलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!