‘जेएनयू’ छात्र संघावर डाव्यांचेच वर्चस्व, आरएसएसप्रणित अभाविपचा धुव्वा; तीन दशकांनंतर निवडला पहिला दलित अध्यक्ष!


नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) छात्र संघाच्या निवडणुकीत आरएसएस समर्थित अभाविपचा दणदणीत पराभव करून डाव्या विद्यार्थी संघटनांच्या युनायटेड लेफ्टने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे १९९६ नंतर प्रथमच डाव्या विचारांची पार्श्वभूमीवर असलेल्या पहिलाच दलित अध्यक्षाची निवड जेएनयू छात्र संघाने केली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर जेएनयूचा परिसर जयभीम, लाल सलामच्या घोषणांनी दणाणून गेला.

जेएनयू छात्र संघाच्या निवडणुकीत युनायटेड लेफ्ट पॅनलने आरएसएसशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) दारूण पराभव केला. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि सह-महासचिव ही चारही पदे युनायटेड लेफ्ट पॅनलने जिंकली आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच आयसाचे उमेदवार धनंजय यांनी २ हजार ५९८ मते घेऊन विजय मिळवला. धनंजय यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी अभाविपचे उमेदवार उमेश अजमीरा यांचा पराभव केला. अजमीरा यांना १ हजार ६७६ मते मिळाली.

जेएनयू छात्र संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १९९६ नंतर म्हणजेच सुमारे तीन दशकांनंतर पहिल्यांदाच दलित उमेदवारीची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये दलित समाजातील भट्टीलाल बैरवा हे जेएनयू छात्र संघाचे अध्यक्ष झाले होते.

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एसएफआयचे अविजीत घोष यांनी अभाविपच्या दीपिका शर्मा यांचा ९२७ मतांनी पराभव केला. घोष यांना २ हजार ४०९ मते तर शर्मा यांना १ हजार ४८२ मते मिळाली. महासचिवपदाच्या निवडणुकीत बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशनच्या उमेदवार प्रियांशी आर्य २ हजार ८८७ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धा अभाविपचे अर्जुन आनंद यांचा त्यांनी ९२६ मतांनी पराभव केला. आनंद यांना १ हजार ९६१ मते मिळाली. युनायटेड लेफ्टच्या उमेदवार स्वाती सिंह यांच्या उमेदवारीवर अभाविपने आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक समितीने त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे युनायटेड लेफ्टने प्रियांशी आर्य यांना पाठिंबा दिला होता.

सह-महासचिवपदाच्या निवडणुकीत एआयएसएफचे मोहम्मद साजीद यांनी अभाविपचे गोविंद दांगी यांचा ५०८ मतांनी पराभव केला. चारही पदाच्या निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे हे सर्वात कमी अंतर आहे. युनायटेड लेफ्ट पॅनलमध्ये आयसा, डीएसएफ, एसएफआय आणि एआयएसएफ या विद्यार्थी संघटनांचा समावेश होता.

…हे ठरले प्रभावी मुद्दे

धनंजय हा बिहारच्या गया येथील असून तो जेएनयूमध्ये स्कूल ठफ आर्ट्स अँड अस्थेटिक्समध्ये पीएच.डी. करत आहे. जेएनयू छात्र संघाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत त्याने विद्यापीठाने एचईएफएकडून घेतलेल्या कर्जामुळे वाढलेले शुल्क आणि विद्यापीठाच्या निधी पुरवठ्यामध्ये झालेली कपात हे कळीचे मुद्दे लावून धरले. ते अत्यंत प्रभावी ठरले. अध्यक्षीय चर्चेत धनंजयने विद्यापीठ कॅम्पसमधील पाणी, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विद्यार्थी नेत्यांच्या सुटकेची मागणी केली.

द्वेष आणि हिंसेचे राजकारण धुडकावले

 हा विजय म्हणजे जेएनयूचे विद्यार्थी द्वेष आणि हिंसेचे राजकारण धुडकावून लावतात, याबाबतची जनमत चाचणी आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही त्यांच्या अधिकारांसाठीची लढाई सुरूच ठेवू आणि विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर काम करणे सुरूच ठेवू. कॅम्पसमधील महिला सुरक्षा, निधीतील कपात, शिष्यवृत्तीत वाढ, पायाभूत सुविधा आणि पाणीप्रश्न हे छात्र संघाच्या प्राधान्यक्रमाचे विषय आहेत, असे धनंजय यांनी या विजयानंतर म्हटले आहे.

विजय का महत्वाचा?

कोरोना महामारीनंतर तब्बल चार वर्षे जेएनयू छात्र संघाची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते. जेएनयूवरील डाव्या विचारांचा पगडा मोडून काढण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर डाव्या विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीत मिळवलेला विजय महत्वाचा मानला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!