आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट!


आळंदीः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या लाखीच्या आळंदीहून होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी आणि पोलिसांत झटापट झाली. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठ्या चालवल्या. पंढरपूरच्या वारीच्या इतिहासात आजपर्यंत वारकऱ्यांवर कधीही लाठीमार झालेला नाही. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभरातून उमटत असून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी पोलिस सरसावले. मात्र वारकरी पुढे निघाले. त्यामुळे पोलिस आणि वारकऱ्यांत वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांना आक्रमकपणे अडवण्याचा प्रयत्न करत वारकऱ्यांवर लाठ्या उगारल्या. एवढेच नव्हे तर काही वारकऱ्यांवर लाठीमारही केला. त्यामुळे हजारोंच्या संख्येने असलेले वारकरी आक्रमक झाले. काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 जे आजवर घडले नाही, ते यावर्षी घडले-राष्ट्रवादी काँग्रेसः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ‘जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे.  माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे,’ असे ट्विट खा. सुळे यांनी केले आहे.

वारीच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते- अजित पवारः विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेली पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्ती परंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्य इतिहासात असे यापूर्वी घडले नव्हते. आजची घटना मनाला दुःख देणारी आहे. सोहळ्याचे योग्य नियोजन करून हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसे घडले नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचे दिसते, असे अजित पवार म्हणाले.

 शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार- पटोलेः  महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षापासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप राज्य सरकारच्या पोलिसांनी केले आहे. शांततेत पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीमार करण्यापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या मुजोर पोलिसांची मजल गेली आहे. वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या मुजोर पोलिस व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे. वारकऱ्यांवरील लाठी हल्ला हा भक्तांचा आणि विठुरायांचा घोर अपमान करण्याचा प्रकार आहे. या सरकारचा मी धिक्कार करतो, असे पटोले म्हणाले.

हा वारकऱ्यांचा अपमान- भुजबळः वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काहीच जबाबदारी नाही का? सरकारने हा प्रकार घडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

हिंदुत्ववादी सरकारचे ढोंग उघडे पडले, मुखवटे गळाले-राऊतः आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अरे अरे… हिंदुत्ववादी सरकारचे ढोंग उघडे पडले, अशा शब्दात राऊतांनी सरकावर निशाणा साधला आहे. ‘ असे अरे… हिंदुत्ववादी सरकारचे ढोंग उघडे पडले. मुखवटे गळून पडले. औरंगजेब यापेक्षा काय वेगळे वागत होता?  वारकऱ्यांचा हिंदू आक्रोश सरकार असा चिरडून टाकत आहे. मोगलाई महाराष्ट्रात पुन्हा अवतरली आहे,’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!