ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांची उचलबांगडी, डॉ. प्रवीण देवकाते निलंबित!


मुंबई:  पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणी चौकशी अहवाल सादर केला असून  अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ.प्रवीण देवकाते यांच्यासह इतर अधिकारी दोषी आढळून आले आहेत. याप्रकरणात डॉ. ठाकूर यांची उचलबांगडी करण्यात आली असून डॉ. देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पलायन केल्या प्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नियुक्ती केली होती.

या समितीच्या चौकशीत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी आढळून आले आहेत.

त्यामुळे घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्याच्याससून सर्वोपचार रुग्णालयातील ड्रग्जसंबंधित घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला १५  दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

समितीने चौकशी करून आपला अहवाल आयुक्तामार्फत ३१ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारला सादर केला असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!