पुणेः शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमले असून भीमा कोरेगाव परिसरात जॅमर लावून इंटरनेटसेवा जॅम करण्यात आल्यामुळे पुस्तके खरेदीला मोठा फटका बसत आहे. यूपीआयद्वारे पेमेंटच करता येत नसल्यामुळे पुस्तक खरेदी करणारे आंबेडकरी अनुयायी आणि पुस्तक विक्रेतेही हैराण झाले आहेत.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आज शौर्यदिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले. महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यातून पंचवीस लाखांहून अधिक अनुयायी भीमा कोरेगावला आले आहेत.
भीमा कोरेगावला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना प्रवासातील गावांमधील नागरिकांनी न्याहरी आणि चहाची व्यवस्था केली आहे. युवकांचे जथ्थे वाहन रॅलीद्वारे भीमा कोरेगावला दाखल झाले आहेत.
रविवारी मध्यरात्रीपासूनच भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसरात आतषबाजी आणि सामुदायिक बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. समता सैनिक दल, महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले आहे.
रविवारी रात्रीनंतर अहमदनगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांसाठी २९ ठिकाणी आरोग्य बुथ उभारण्यात आले आहेत. २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह शंभर खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहेत.
इंटनेटसेवा जॅम केल्याचा पुस्तक खरेदीला फटका
अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव आणि पेरणे परिसरात येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली खरी परंतु या परिसरात जॅमर लावून इंटरनेटसेवा जॅम करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल फोनवरून फक्त कॉल करता येऊ लागले आहेत. परिणामी या इंटरनेट जॅमिंगचा मोठा फटका पुस्तक खरेदीला बसला आहे.
सध्या प्रत्येक जण डिजिटल पेमेंटला पसंती देतो. त्यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याचे दिवस इतिहास जमा झाले आहेत. परिणामी यूपीआय पेमेंटच करता येत नसल्यामुळे पुस्तके खरेदीसाठी गर्दी करणारे आंबेडकरी अनुयायी आणि पुस्तकांचे स्टॉल्स लावून बसलेले पुस्तक विक्रेते हैराण झाले आहेत. यातून लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आंबेडकरी अनुयायी आणि पुस्तके विक्रेते करत आहेत.
‘भीमा कोरेगाव परिसरात जॅमर बसवून इंटरनेटसेवा जॅम करण्यात आल्यामुळे आंबेडकरी अनुयायांना यूपीआयद्वारे पेमेंट करणे अशक्य झाले आहे. त्याचा मोठा फटका पुस्तक खरेदीला बसला आहे. आम्ही रविवारपासून येथे स्टॉल्स लावून बसलो आहोत. पुस्तके खरेदीला आंबेडकरी अनुयायी येत आहेत, परंतु यूपीआयद्वारे पेमेंटच करता येत नसल्यामुळे निवडलेली पुस्तके ठेवून ते माघारी परतत आहेत.’
–विनय हातोले, पुस्तक विक्रेता