कोहिनूरच्या अध्यक्ष-सचिवांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर शिक्षकांवर दबाव टाकून सोडवून घेतले एमए हिंदीचे स्वतःचे पेपर!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन ‘अचानक’ राज्य सरकारला परत केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले औरंगाबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी विद्यार्थी म्हणून स्वतःच्याच महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या एम.ए. (हिंदी) प्रथम सत्राच्या परीक्षेत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याच हस्ताक्षरात पेपर सोडवून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. या अभ्यास केंद्राचा संकेतांक २१२३४ असा आहे. या अभ्यास केंद्रावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी एम.ए. (हिंदी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या अभ्यास केंद्राला डिसेंबर २०२४ च्या सत्र परीक्षेचे परीक्षा केंद्रही देण्यात आले होते.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या अध्यक्षांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८९ लाख रुपये वेतन केले परत, सहसंचालक महाविद्यालयात धडकताच झाला ‘सिंघम’स्टाइल राडा!

कोहिनूर महाविद्यालयाच्याच परीक्षा केंद्रावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी एम. ए. हिंदी प्रथम सत्राची परीक्षा दिली. १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५ या काळात झालेल्या या परीक्षेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी स्वतः पेपर न सोडवता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक फेरोज व कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांच्यासह अन्य शिक्षक व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याच हस्ताक्षरात एम.ए. हिंदी प्रथम सत्राचे सर्व लेखी पेपर सोडवून घेतले.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

कोहिनूर संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  यांचा एम.ए. (हिंदी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कायम नोंदणी क्रमांक २०२४०१७०००२७९०१२ असा आहे तर परीक्षेचा बैठक क्रमांक जेएम ८५००००५९ असा आहे. तर संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा खान मोहम्मद मझहर खान यांचा कायम नोंदणी क्रमांक  २०२४०१७०००२१७६५७ असा असून परीक्षेचा बैठक क्रमांक जेएम ८५००००५८ असा आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने ढापले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेही पैसे, कोट्यवधींच्या अनामत रकमेवरही डल्ला!

विशेष म्हणजे एखाद्या परीक्षार्थ्याला कोणत्याही परीक्षेत काही अपरिहार्य वैद्यकीय कारणांमुळे स्वतःच्या हस्ताक्षरात परीक्षेचे पेपर सोडवणे शक्य नसेल तर त्या परीक्षार्थ्याला विद्यापीठाकडे रितसर अर्ज करून परीक्षेपूर्वीच लेखनिकाची मागणी करून परवानगी घ्यावी लागते. परंतु कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे नाशिकला किंवा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विभागीय केंद्र संचालकांकडे त्यासाठी कुठलाही अर्ज केला नव्हता.

हेही वाचाः शासनाकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी एकाच तुकडीला मंजुरी असतानाही चार-चार तुकड्या दाखवून कोहिनूर महाविद्यालयाची खुलेआम दुकानदारी!

स्वतःचेच महाविद्यालय, स्वतःचेच परीक्षा केंद्र आणि स्वतःच विद्यार्थी असलेले कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी परस्पर बेकायदेशीरपणे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याकडून त्यांच्याच हस्ताक्षरात एम.ए. हिंदीच्या प्रथम सत्र परीक्षेचे सर्वच्या सर्व लेखी पेपर सोडवून घेतले, अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले चार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस, जीपीएफचेही लक्षावधी रुपये; आता तरी कारवाई होणार का?

कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी स्वतःच्याच महाविद्यालयातील परीक्षा केेंद्रावर एम.ए. हिंदीची परीक्षा दिली आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून सर्वच्या सर्व लेखी पेपर त्यांच्याच हस्ताक्षरात सोडवून घेतल्याची तक्रार उच्च शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

हस्ताक्षर तपासून ४२० चा गुन्हा दाखल कराः गायकवाड

कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी विद्यापीठ व शासनाची फसवणूक करून परस्पर त्रयस्थ व्यक्तींकडून एम.ए. हिंदीच्या प्रथम सत्राचे सर्वच्या सर्व लेखी पेपर सोडवून घेतले. या सर्व उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षराची तपासणी करून संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करावा आणि हे अभ्यास केंद्र व परीक्षा केंद्र तत्काळ बंद करा, अशी मागणी रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!