कोहिनूर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने अखेर नांगी टाकली, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम प्राचार्यांच्या एकल खात्यावर जमा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  राज्य शासनाकडून प्राप्त झालेली शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाची रक्कम ‘अचानक’ परत केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने अखेर नांगी टाकली आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनाची ८८ लाख ९१ हजार ४२५ रुपये रक्कम प्राचार्यांच्या नावे असलेल्या एकल वेतन खात्यावर जमा करण्यात आली. त्यामुळे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांकडून वेतनासाठी होणाऱ्या अडवणुकीतून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे.

कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांना १८ जानेवारी रोजी पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनापोटी राज्य शासनाकडून प्राप्त झालेले धनादेशाद्वारे ‘अचानक’ परत करून टाकले होते. कर्मचारी कर्तव्यात कसूर करतात, महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात आणि महाविद्यालयाच्या अकाऊंटमध्ये अफरातफर झाल्याची फुटकळ कारणे त्यासाठी दिली होती.

कोहिनूरच्या अध्यक्षांचे हे पत्र २० जानेवारी रोजी प्राप्त होताच वेतन अनुदान हस्तांतरित करून २० दिवस उलटले तरी कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले नाही, ही बाब लक्षात येताच विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर हे २१ जानेवारी रोजी थेट महाविद्यालयात जाऊन धडकले.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या अध्यक्षांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८९ लाख रुपये वेतन केले परत, सहसंचालक महाविद्यालयात धडकताच झाला ‘सिंघम’स्टाइल राडा!

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी बोलून नेमकी परिस्थिती समजून घेण्याचा डॉ. निंबाळकर यांनी प्रयत्न केला. परंतु कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी तुम्ही इथे कसे काय आलात? ज्या जमिनीवर तुम्ही उभे आहात, ती जमीन माझी आहे, असे सांगत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

डॉ. निंबाळकर यांनीही संस्थेच्या अध्यक्षांना ‘सिंघम’ स्टाइल चोख प्रत्युत्तर देत ही सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे, तुमची खासगी मालमत्ता नाही. महाविद्यालयाचे प्राचार्य थेट माझ्या अधिपत्याखाली येतात, तुमचा माझा संबंध नाही. त्यामुळे नीट बोला, अन्यथा मला पुढची कारवाई करावी लागेल, असे सुनावले होते. हा ‘सिंघम’ स्टाइल राडा पाहून प्रचंड दहशतीखाली असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अंगात बळ संचारले आणि त्यांनी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या संस्थेचे सहसचिव डॉ. मकसूद खान यांच्या कानाखाली जाळ काढला होता.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने ढापले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेही पैसे, कोट्यवधींच्या अनामत रकमेवरही डल्ला!

विभागीय सहसंचालक डॉ. निंबाळकर यांच्याशी केलेले वर्तन आपल्या अंगलट येणार हे नंतर लक्षात आल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी शुक्रवारी (२४ जानेवारी) विभागीय सहसंचालक कार्यालय गाठून झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विभागीय सहसंचालक डॉ. निंबाळकर यांनी नियमानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन प्राचार्यांच्या नावे असलेल्या एकल वेतन खात्यावरच होईल, संयुक्त वेतन खाते चालणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी अनिच्छेने का होईना त्यासाठी नाहरकत दिली.

हेही वाचाः शासनाकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी एकाच तुकडीला मंजुरी असतानाही चार-चार तुकड्या दाखवून कोहिनूर महाविद्यालयाची खुलेआम दुकानदारी!

‘संस्थाचालक बोलतात एक आणि करतात दुसरेच’ हा अनुभव पाठीशी असल्यामुळे विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून कोहिनूर महाविद्यालयाचे वेतन खाते असलेल्या बँकेला पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन हे केवळ प्राचार्यांच्या नावे असलेल्या एकल खात्यामार्फतच अदा करण्यात यावे, अशी खुट्टी मारली. त्यामुळे कोहिनूरचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांचा ‘वेळ मारून नेण्याच्या’ इदाऱ्यावर पाणी फेरले आणि संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्यांच्या संयुक्त नावे असलेले वेतन खाते एकट्या प्राचार्यांच्या नावे एकल खाते करावे लागले. आता डिसेंबर महिन्याच्या वेतनाची रक्कम प्राचार्यांच्या नावे असलेल्या एकल वेतन खात्यावर जमा करण्यात आली आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले चार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस, जीपीएफचेही लक्षावधी रुपये; आता तरी कारवाई होणार का?

विभागीय सहसंचालक डॉ. निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे  २१ जानेवारी रोजी ‘संस्थाचालक अंगात संचारलेल्या’ डॉ. मोहम्मद मझहर खान यांना सपशेल माघार घेत नांगी टाकावी लागली. आता कोहिनूर महाविद्यालयाचे वेतन खाते प्राचार्यांच्या एकल नावे झाल्यामुळे यापुढे डॉ. मोहम्मद मझहर खान यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतनासाठी अडवणूक करता येणार नाही. एकटे प्राचार्यच वेतनाची रक्कम शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. आज सायंकाळपर्यंत ही रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोहिनूर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!