बेंगळुरूः भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसोबत बसायचे आणि उरलेला संपूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या शुद्र व्यक्तीचे मुंडके धडावेगळे केले होते. त्यामुळे ते आदर्श कसे काय असू शकतात? असा सवाल कर्नाटकमधील निवृत्त प्राध्यापक आणि प्रसिद्ध कन्नड लेखक के. एस. भगवान यांनी केला आहे. रामराज्याच्या संकल्पनेवरही त्यांनी टिकास्त्र सोडले.
कर्नाटकातील मंड्या येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या रामराज्य निर्माण करण्याबाबत चर्चा केली जात आहे. परंतु तुम्ही जर वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड वाचले तर भगवान राम हे आदर्श नव्हते हे तुमच्या लक्षात येईल. भगवान रामांनी ११ हजार वर्षे राज्य केलेच नव्हते. त्यांनी फक्त ११ वर्षे राज्य केले होते, असा दावाही प्रा. के. एस. भगवान यांनी केला आहे.
दुपारच्यावेळी राम हे सीतेसोबत बसायचे आणि उरलेला संपूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे. त्यांनी त्यांची पत्नी सीतेला अरण्यात पाठवले. त्यांनी तिच्याबद्दल कोणताही विचार केला नाही की सीतेची पर्वा केली नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या शुद्र व्यक्तीचे मुंडके धडावेगळे केले होते. हे मी नाही म्हणत तर वाल्मिकी रामायणात नमूद आहे. त्यामुळे राम हे आदर्श कसे असू शकतात? असेही प्रा. भगवान म्हणाले.
राम स्वतःही प्यायचे आणि सीतेलाही पाजवायचेः कन्नड लेखक के. एस. भगवान यांचे ‘राम मंदिर येके बेडा’ हे पुस्तक २०१८ मध्ये प्रसिद्ध झाले. वाल्मिकी रामायणानुसार भगवान राम ‘नशा’ पित होते आणि सीतेलाही त्याचे सेवन करायला लावत होते, असा त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकावरून तेव्हाही वाद झाला होता. काही लोकांनी त्यांच्या घराबाहेर भगवान श्रीरामाची पूजा करण्याचाही प्रयत्न केला होता. गेल्यावर्षी कर्नाटकात न्यायालयाबाहेर एका वकिलाने त्यांच्यावर शाईहल्लाही केला होता.