
जालनाः मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेव्हणा विलास खेडकर याच्यासह ९ जणांवर शनिवारी जालना जिल्हा प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे. या नऊ जणांना जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातून आहे. वाळू माफियांवरील धडक कारवाईचा एक भाग म्हणून ही तडीपारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तडीपार करण्यात आलेल्या नऊ वाळू माफिया व अट्टल गुन्हेगारांपैकी ६ जण हे मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय आहेत.
गोदावरी नदी पोखरून वाळूची अवैध तस्करी करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्या कारवाईचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे सख्खे मेव्हणे विलास खेडकर याच्यासह नऊ जणांना तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्या नऊ आरोपींवर वाळू चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले, सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही आरोपींविरुद्ध तर २०१९ पासून गुन्हे दाखल आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सख्खे मेव्हणे विलास खेडकर याच्या विरोधात २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २०२३ मध्ये गोदीवरी नदीतून ४ लाख ८१ हजार रुपयांची १०० ब्रास वाळू चोरी केल्याचाही गुन्हा दाखल आहे.
विलास खेडकरवर २०२३ मध्येच पाथरवाला बुद्रुक येथे गोदीवरी नदीतून क्रेनच्या साह्याने ५०० ब्रास वाळूची तस्करी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच २०२३ मध्ये शहागड येथे बस जाळल्याप्रकरणीही त्याच्या विरोधात कलम ३०७,३५३ आणि ४३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
अंबडच्या उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने विलास खेडकरसह ९ आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री तडीपारीची कारवाई आली आहे. या सर्व आरोपींविरोधात जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ज्या नऊ जणांना तडीपार करण्यात आले आहे, त्यापैकी विलास खेडकरसह ६ जण हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय आहेत. त्यात गजानन सोळंके, सुयोग सोळंक, केशव वायभट यांचा समावेश आहे. या नऊ आरोपींना सहा महिन्यांसाठी जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या गोदावरी नदीकाठच्या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आली आहे.
जालना जिल्हा प्रशासनाने तडीपार केलेल्यामध्ये घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील वामन मसूरराव तौर, मसूरराव तौर, अंबड येथील संदीप सुखदेव लोहकरे, अंबड तालुक्यातील गंधारी येथील विलास हरिभाऊ खेडकर, कुरण येथील गोरख बबनराव कुरणकर, अंकुशनगर येथील अमोल केशव पंडित, केशव माधव वायभट, गोंदी येथील गजानन गणपत सोळंके आणि सुयोग मधुकर सोळंके यांचा समावेश आहे.
कोणावर कोणते गुन्हे?
गजानन सोळुंके
- २०१२ मध्ये पोलिस स्टेशनवर हल्लाः फिर्याद देण्यास आलेल्या साक्षीदाराला मारहाण करून पोलिस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी कलम ३०७ आणि ३५३ अन्वये गुन्हा.
- २०१९ मध्ये सहकाऱ्यांशी आपापसात मारहाण केल्याप्रकरणी कलम ३२४ अन्वये गुन्हा.
- २०२३ मध्ये गोदावरी मधून १०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
- २०२३ मध्ये अवैध वाळू उत्खनन आणि चोरी प्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल.
सुयोग सोळुंके
- २०१२ मध्ये पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीला धमकावून मारहाण तसेच पोलिस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी कलम ३०७ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल.
- २०२० मध्ये साली दुचाकीची धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
- २०२३ मध्ये गोदावरी नदीतून १०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
- २०२५ मध्ये स्वतःच्या मालकीच्या हायवामधून वाळू चोरी केल्याचा गुन्हा.
केशव वायभट
- २०१९ मध्ये गोदावरी नदीपत्रातून वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा.
- २०१९ मध्ये स्वतःच्या मालकीच्या हायवामधून वाळू चोरी केल्याप्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल.
- २०२३ मध्ये गोदावरी नदीपात्रातून १०० ब्रास अवैधरित्या वाळू उपसा करून चोरी केल्याप्रकरणी गुन्हा.
- १ सप्टेंबर २०२३ रोजी शहागड येथील बस जाळल्या प्रकरणी कलम ३०७ व ३५३ अन्वये गुन्हा दाखल.