‘जय श्रीराम’चा हत्यार म्हणून वापर, हिंदूराष्ट्राच्या दिशेने वाटचाल राज्यघटनेच्या विरूद्धः अयोध्या खटल्यातील वकिलाचे मोठे विधान


नवी दिल्लीः  अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाल्यानंतर देशभरातील विविध मान्यवरांनी याबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. बाबरी मशीद खटल्यात मुस्लिम गटाची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी याबाबत भूमिका मांडताना मोठे विधान केले आहे. जय श्रीराम म्हणण्यावर कुणाचा काहीच आक्षेप नाही. पण त्याचा हत्यार म्हणून वापर का करताय? असा थेट सवाल त्यांनी केला असून आपली वाटचाल हळूहळू हिंदूराष्ट्राच्या दिशेने होऊ लागली आहे, हे राज्यघटनेच्या विरोधात आहे, असेही धवन यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद खटल्यात सुन्नी वक्फ बोर्ड व इतर मुस्लिम गटांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत राम मंदिराच्या राजकीयीकरणाला तीव्र विरोध करत मोठी भीती व्यक्त केली आहे.

कुणीही मंदिराच्या विरोधात नाही. पण त्याच्या राजकीयीकरणास आमचा विरोध आहे. खरी बाब म्हणजे सरकारने मंदिराच्या कामात आर्थिक मदत केली आहे. नृपेंद्र मिश्रा हे एक सरकारी अधिकारी होते. त्यांना राम मंदिराच्या बांधकामाचे प्रमुख बनवले. आपण विविधता असणारा देश आहोत. या प्रकारचे राजकीयीकरण या विविधतेकडेच दुर्लक्ष करते. आपण हळूहळू हिंदूराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहोत. हे आपल्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे, अशी रोखठोक भूमिका राजीव धवन यांनी मांडली आहे.

राम ठळकपणे बिंबवण्याची गरज काय?

प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत, असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. ते सगळ्यांचे आहेतच. पण त्यासाठी तुम्हाला ते इतके ठळकपणे बिंबवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. हे राजकीयीकरण आपल्या सर्व नीतीमूल्यांच्या विरोधात आहे, असेही धवन म्हणाले.

हे सरकार फक्त हिंदूंसाठीच…

देशातील सरकार हे फक्त हिंदूंसाठीच आहे, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कुंभमेळा काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अशा गोष्टींचे राजकीयीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे दोनच संधी आहेत (राम मंदिर आणि कुंभमेळा). या सरकारने कितीही दावे केले तरीही हे सरकार फक्त हिंदूसाठीच आहे, हे स्पष्टच दिसते, असेही राजीव धवन म्हणाले.

‘जय श्रीराम’चा हत्यार म्हणून वापर का करायचाय?

‘जय श्रीराम’ या घोषणेचा हत्यार म्हणून वापर का करताय? असा थेट सवालही राजीव धवन यांनी उपस्थित केला आहे. हा सवाल करताना बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीवेळी घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भही दिला. ‘मी जेव्हा युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात प्रवेश करायचो, तेव्हा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जायच्या. माझ्यावर न्यायालयात झालेल्या हल्ल्यातून मला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवले. मला तेच पुन्हा उगाळत बसायचे नाही. जय श्रीराम म्हणण्यावर कुणाचा काहीच आक्षेप नाही. पण त्याचा हत्यार म्हणून वापर का करायचा?,’ असा सवालही राजीव धवन यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!