महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य: प्रधानमंत्री मोदी


पुणे: पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

स.प. महाविद्यालयात आयोजित समारंभात प्रधानमंत्री मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलली. देशाची संस्कृती आणि परंपरा महान असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा निर्माण केला. देशासमोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे महत्व ओळखून त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्र सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला, असे मोदी म्हणाले.

गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग सोप्या पद्धतीत सांगितला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मोदी यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तृत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्लडला जावून बॅरिस्टर होता यावे यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारसही टिळकांनी केली होती, अशी आठवण मोदींनी सांगितली.

न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थापना ही त्यांची दूरदृष्टी दर्शवून देते. या संस्थातून असे कित्येक युवा निघाले ज्यांनी टिळकांचे मिशन पुढे चालवले. राष्ट्रनिर्माणामध्ये आपली भूमिका बजावली. व्यवस्था निर्मितीकडून संस्थांची निर्मिती, संस्था निर्मितीतून व्यक्तीनिर्मिती आणि व्यक्तीनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते. त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचाल करत आहे. देशातील लोकांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे मोदी म्हणाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम ‘नमामी गंगे’ प्रकल्पाला देत असल्याची घोषणा मोदी यांनी केली.

शरद पवारांनी एका वाक्यात उल्लेख करून मोदींना टाळलेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले होते. त्यामुळे आपल्या भाषणात शरद पवार नेमके काय बोलणार याबाबतची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी एका वाक्यात मोदींचा उल्लेख करून अभिनंदन केले आणि हा विषयच संपवला.

यापूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, डॉ.शंकरदयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला याचा आनंद आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांचे मोलाचे योगदान आहे. नव्या पिढीला या कर्तृत्ववान दृष्टीचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले.

स्वागत करताना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. टिळक यांनी लोकमान्य टिळक यांचे व्यक्त‍िमत्व आणि कार्य यांची ओळख करुन दिली. तसेच ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यामागील भूमिका विशद केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!