
मुंबई: सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे निवेदन संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केले.
गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून, याप्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात येत आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर ‘ईश्वरपूर’ असे करण्यात येईल, यांनी पाटील निवेदनात म्हटले आहे.
विधानसभेतही निवेदन: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता.वाळवा) शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार आहे. याबाबत अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे. ईश्वरपूर नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. त्यामुळे इस्लामपूरच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.