मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती २८ व २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.
मुलाखतीस अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीसाठी विहित दिनांकास व विहित वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, ११ वा मजला, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट क्रं. ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४ येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सही व शिक्क्यासह प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र मुलाखतीच्यावेळी सादर करणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यातील सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून, मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.