जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील  गैरव्यवहाराची चौकशी सुरू, अधीक्षक कृषी अधिकारी निलंबित


मुंबई:  नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जालना उपविभागाअंतर्गत  शेडनेट हाऊस या घटकांची अंमलबजावणी करताना उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी चौकशी प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण होणार असून चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी दिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पोकरा योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत प्रश्न विचारला होता. सदस्य सदाभाऊ खोत, भाई जगताप यांनी यात उपप्रश्न विचारले, त्यावेळी ते बोलत होते.

उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांना १० जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत पदोन्नती मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर चव्हाण यांना उपविभागीय कृषी अधिकारी या पदावरून अधीक्षक कृषी अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली. तथापि पोकरा योजनेत शेडनेटसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे कोकाटे म्हणाले.

या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली असून जालना जिल्ह्यातील ३२५८ शेडनेटपैकी २३५८ शेडनेटची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित ९०० प्रकरणांची तपासणी पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जाईल, असे कोकाटे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!