नवी दिल्लीः वेदान्ता- फॉक्सकॉन पाठोपाठच टाटा- एअरबसचा देशातील पहिल्या लष्करी मालवाहू विमानांची निर्मिती करणारा सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातमध्ये गेला आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरू व्हावा, असा महाराष्ट्राचा प्रयत्न होता. शिंदे- फडणवीस सरकारचा हा प्रयत्न असफल ठरला आहे. आता हा प्रकल्प गुजरातच्या बडोद्यामध्ये होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी त्याचे भूमीपूजन करणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे.
लवकरच गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांबरोबरच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या जातील, असे मानले जात होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगावर टिकेची झोडही उठली. हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या असत्या तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना टाटा- एअरबस प्रकल्पाचे भूमीपूजन करता आले नसते!
भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीचा हा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरूवारी नवी दिल्लीत केली. वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने आधी आणि नंतर शिंदे- फडणवीस सरकारने प्रयत्न केले होते. परंतु हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला असला तरी महाराष्ट्राला तेवढाच मोठा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी जाहीर केले होते. टाटा- एअर बसचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारणीसाठी प्रयत्न केले होते. परंतु हा प्रकल्पही गुजरातमध्ये गेल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले.
आता प्रधानमंत्री मोदी रविवारी बडोद्यात या प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. या प्रकल्पामुळे हजारो नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा केला जात आहे. निवडणुकीमध्ये बेरोजगारी आणि नोकरीचे मुद्दे चर्चिले जात आहेत. २१ हजार ९३५ कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून सी-२९५ विमानांची निर्मिती केली जाईल. एखाद्या खासगी कंपनीकडून भारतात लष्करी विमानांची निर्मिती केली जाणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. सी-२९५ विमानांचा नागरी आणि लष्करी अशा दोन्ही बाबींसाठी वापर करता येणार आहे. निर्यातीबरोबरच भारतीय हवाई दलाच्या अतिरिक्त ऑर्डर हा प्रकल्पातून पूर्ण केल्या जाणार आहेत.
मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात भारताने हवाई दलातील जुनी एव्हरो-७४८ विमाने बदलण्यासाठी एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीसोबत ५६ सी-२९५ विमान खरेदीचा २१ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानुसार एअरबस भारताला चार वर्षांत स्पेनच्या सेव्हिले येथील प्रकल्पातून उड्डाण घेण्यास पूर्णतः सज्ज असलेली १६ विमाने देईल. त्यानंतर ४० विमाने भारतात टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स कंपनीच्या माध्यमातून निर्मिती आणि असेम्बल केली जातील. दोन्ही कंपन्यामध्ये याबाबतचा करार झाला आहे.
काय आहे खासियत?: वाळवंटापासून समुद्री वातावरणापर्यंत, अत्यंत उष्ण तापमानापासून ते अतिश थंड तापमानापर्यंत, सर्व मोसमातील युद्ध मोहिमांमध्ये सी-२९५ रात्रंदिवस संचलित राहते, हे पूर्णतः प्रमाणित आहे, अशी या विमानाची खासियत असल्याचे एअरबसने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे. भारतीय हवाई दलाची ५६ विमानांची मागणी पूर्ण झाल्यानंतर एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीला भारतात निर्मिती करण्यात आलेली विमाने नागरी हवाई वाहतूक ऑपरेटर्स आणि भारत सरकारने मंजुरी दिलेल्या देशांना निर्यात करण्याची परवानगी दिली जाईल, असे संरक्षण सचिव अजयकुमार म्हणाले.