मुंबईः बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र न झाल्यामुळे राज्यात फारसा पाऊस झाला नाही. परंतु या आठवड्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्राच्या अंतर्भागात फायदा होऊ शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी म्हटले आहे.
बुधवारनंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊ शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यासह आता आयोडीही सकारात्मक होत असल्यामुळे या दोन्हीचा फायदा राज्याला होऊ शकतो, अशी हवामान विभागाची अपेक्षा आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज बुधवारपासून विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात उद्या गुरूवारपासून छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात उद्या गुरूवारपासून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मंगळवारी वर्तवण्यात आलेल्या पुढील पाच दिवसांसाठीच्या अंदाजानुसार शनिवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात शनिवारपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.
…तर २४ सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस
बंगालच्या उपसागरात या आठवड्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानंतर पुढील आठवड्यात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल स्थिती या आठवड्याच्या अखेरीस अधिक स्पष्ट होईल. या कमी दाबाच्या पट्ट्याचाही वायव्य दिशेने प्रवास झाल्यास या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात २४ सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस राज्यात पाऊस झाला तर ऑगस्टमध्ये निर्माण झालेली पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते.