‘कोल्हापूरचे पैलवान आणून त्याची चरबी वितळवतो’, कुलगुरू डॉ. विजय फुलारींची अधिसभा सदस्यास धमकी; भयग्रस्त सदस्याने मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून या-ना त्या कारणाने वाद ओढवून घेणारे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आता नवीन वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी एका अधिसभा सदस्याचे थेट नाव घेऊन ‘कोल्हापूरचे पैलवान आणून त्याची चरबी वितळवतो’ अशी धमकी दिल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली असून कुलगुरूंपासून जिवितास धोका असल्याचे सांगत पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे २१ फेब्रुवारी रोजी होणारी अधिसभेची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील कळंब येथील महर्षी ज्ञानदेव मोरेकर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आहेत. प्राध्यापक संवर्गातून अधिसभेवर निवडून गेलेल्या डॉ. कांबळे यांनी १६ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करत त्यांच्यापासून आपल्या जिविताला धोका निर्माण झाल्यामुळे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

हेही वाचाः ‘तुम्ही एकटेच शहाणे आणि बाकीचे गाढव आहेत का?’ अधिसभा बैठकीत कुलगुरू डॉ. फुलारींनी मुक्ताफळे उधळताच गदारोळ, अखेर शब्द मागे घेत हाराकिरी!

मागील काही काळात विद्यापीठाच्या अधिसभांमध्ये मी विद्यार्थी, प्राध्यापक व विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सातत्याने प्रश्न मांडत आलो आहे. परंतु कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे सभागृहातील चर्चा वैयक्तिक पातळीवर घेत असल्याचे वारंवार जाणवत आले आहे. विविध अधिसभा सदस्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावणे, वैयक्तिक बोलावून धमकी देणे, तुमची मान्यता रद्द करू शकतो, तुमच्यावर गुन्हे दाखल करू शकतो, तुमच्या संस्थाचालकांवर दबाव टाकून नोकरी गमावू शकतो अशा शब्दांत ते वारंवार विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या सदस्यांना धमकावत असल्याचे डॉ. संजय कांबळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचाः ‘एक तर मी विद्यापीठ सोडावं किंवा जीव अशी परिस्थिती…’वाचा कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप करणारी उपकुलसचिव हेमलता ठाकरेंची सुसाईड नोट

आयपीएस नातेवाईकाच्या नावावरही धमक्या

 कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे महाराष्ट्र पोलिस दलात उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या आपल्या नातेवाईकाचा संदर्भ देऊनही धमकावत असल्याचे डॉ. कांबळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे. ‘माझे चुलत भाऊ सुनिल फुलारी हे कोल्हापूर येथे आयजीपी पदावर कार्यरत आहेत,’अशा प्रकारे पोलिसी कारवाईची भीती दाखवून दडपण आणत असल्याचे अनेक सदस्यांच्या निदर्शनास आले आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘वैदिक ब्रह्मविद्ये’चे खुलेआम उदात्तीकरण, दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी दिला उपराष्ट्रपतींना ‘उपनिषद’ ग्रंथ भेट!

कोल्हापूरचे पैलवान आणून…

२१ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक होणार आहे. या सभेत डॉ. संजय कांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात चुकीची माहिती देण्यात आली आल्याचा आक्षेप घेत डॉ. संजय कांबळे यांनी विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल आणि उच्च शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. डॉ. विजय फुलारी हे जाणीवपूर्वक भेदभाव करत असल्याचे सांगत अनुसूचित जाती जमाती आयोगाकडेही तक्रार केली आहे.

हेही वाचाः घोडचुकाच भोवल्या! जमेच्या बाजूही सादर करण्यात कुलगुरू डॉ. फुलारींची ‘टीम आयक्यूएसी’ अपयशी, संशोधनात अग्रेसर असूनही मांडली चुकीची आकडेवारी!

 ‘चार दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘संजय कांबळे खूप माजलेला आहे. त्याची चरबी वितळवणार आहे. कोल्हापूरचे पैलवान आणून दाखवणार आहे,’ अशा अत्यंत अवमानकारक व धमकीच्या स्वरुपाच्या वक्तव्याचा उल्लेख केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. ही भाषा एका कुलगुरूंना शोभणारी नसून माझ्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका निर्माण करणारी आहे, असेही डॉ. कांबळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

शारीरिक इजा केली जाण्याची भीती

२१ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहताना मला शारीरिक इजा किंवा अडथळा निर्माण होण्याची वस्तुनिष्ठ भीती वाटत आहे. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून मला बैठकीला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मला दोन सशस्त्र पोलिसांचे संरक्षण देण्यात यावे, छत्रपती संभाजीनगरमधील माझ्या वास्तव्यादरम्यान आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, भविष्यात कोल्हापूर येथे अधिकृत कामानिमित्त गेल्यास तेथील स्थानिक पोलिस प्रशासनास सूचित करून आवश्यक संरक्षणाची तरतूद करावी, अशा मागण्यासाठी डॉ. कांबळे यांनी या तक्रारीत केल्या आहेत.

हेही वाचाः ‘भरलेले कान’ पिळले जाताच विद्यापीठातील दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या तडकाफडकी खंडित केलेल्या सेवा पुन्हा बहाल!

आपण कायद्याचा आदर करणारा नागरिक व विद्यापीठाचा निवडून आलेला प्रतिनिधी आहे. माझी भूमिका केवळ शैक्षणिक व लोकशाही पद्धतीने प्रश्न मांडण्यापुरती मर्यादित आहे. त्यामुळे आपल्या जिवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असेही डॉ. संजय कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. डॉ. कांबळे यांच्या या तक्रारीचे पडसाद २१ फेब्रुवारीच्या अधिसभा बैठकीत उमटण्याची शक्यता असून त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

पुरेसा वेळ न देताच अर्थसंकल्प मंजूर करण्याचा घाट?

२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत विद्यापीठाचा वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. परंतु १७ फेब्रुवारीपर्यंत अधिसभा सदस्यांना या अर्थसंकल्पाची अधिकृत प्रत उपलब्ध करून देण्यात आली नाही. ही बाब केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून अधिसभेच्या घटनात्मक अधिकारांवर थेट आघात करणारी असल्यामुळे ही बैठक तत्काळ पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी डॉ. संजय कांबळे यांनी विद्यापीठांचे कुलपती आणि अधिसभेचे अध्यक्ष असलेल्या राज्यपालांकडे कुलसचिवांमार्फत केली आहे.

हेही वाचाः कुलगुरू डॉ. विजय फुलारींवर उचित कार्यवाही करा, राज्यपाल सचिवालयाचे उच्च शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना निर्देश

अर्थसंकल्पाची प्रत वेळेत उपलब्ध करून न देता अर्थसंकल्पाला काही दिवसांत अथवा औपचारी मंजुरी घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अधिसभेला केवळ ‘रब स्टॅम्प’ बनवण्यासारखे आहे. किमान सात दिवस आधी अर्थसंकल्पाची प्रत उपलब्ध करून देणे ही सुस्थापित, लोकशाही व पारदर्शक प्रशासकीय परंपरा आहे. या परंपरेचे उल्लंघन करून सदस्यांना अभ्यासाची संधी न देता अर्थसंकल्पावर चर्चा व निर्णय घेण्यास भाग पाडणे हे नैसर्गिक न्याय तत्वाच्य विरोधात आणि अधिसभा सदस्यांच्या अधिकारांचे हनन आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. ही बैठक पुढे न ढकलल्यास कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!