मुंबईः गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून हवामान विभागाने आज बुधवारी (२५ सप्टेंबर) राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.
देशात मान्सूनच्या परतीला सुरूवात झाली आहे. सध्या परतीचा मान्सून पश्चिम राजस्थानपासून गुजरातमधील कच्च भागापर्यंत पोहोचला आहे. परिणामी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत असून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील चार दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील चार दिवसांसाठी ही परिस्थिती राहील, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
ऑरेंज अलर्टः मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
यलो अलर्टः पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.