बुलढाणाः मागील आठवड्यापासून शेगाव तालुक्यातील काही गावांत धुमाकूळ घातलेल्या टक्कल व्हायरसचा आता नांदुरा तालुक्यातही शिरकाव झाला असून वाडी गावात केस गळती आणि टक्कल पडलेले ७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या केस गळतीचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी आज (१३ जानेवारी) दिल्ली आणि चेन्नई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची पथके बुलढाणा जिल्ह्याला भेट देणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केस गळती होऊन टक्कल पडलेले रूग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. शेगाव तालुक्यातील काही गावात पसरलेल्या टक्कल व्हायरसची साथ पूर्णपणे नियंत्रणात आलेली नसतानाच आता नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी गावात केस गळती होऊन टक्कल पडलेले ७ रुग्ण आढळून आले आहेत.
नांदुरा तालुक्यात केस गळतीचे रुग्ण आढळून आल्यामुळे तालुका आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शनिवारी आरोग्य यंत्रणेच्या वतीने वाडी गावात सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात ७ रुग्णांची केस गळती होऊन टक्कल पडल्याचे आढळून आले. त्याच चार महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. तीन कुटुंबातील हे सात रुग्ण ३ ते ४५ वयोगटातील आहेत.
वाडी गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारी वाडी गावातील गावकऱ्यांचे रक्त नमुने घेण्यात आले. मात्र केसगळतीचा रक्तदोषाशी संबंध नसल्याचे आढळून आले आहे. टक्कल व्हायरसने बाधित गावातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. तसेच पाण्याच्या नमुन्यात अर्सेनिक मर्क्युरी कॅट्रोमियमचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असल्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
आज येणार दिल्ली, चेन्नईची पथके
या केसगळती आणि टक्कल पडण्याचे नेमके कारण काय? हे शोधण्यासाठी आज (१३ जानेवारी) दिल्ली आणि चेन्नई येथून तज्ज्ञांची पथके बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि ऍलोपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या केसगळतीच्या आजारावर संशोधन करत आहेत. दरम्यान, नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केले आहे.
प्रताप जाधव यांनी टक्कल व्हायरसबाधित गावांना भेट देऊन पाहणी केली. असा आजार पहिल्यांदाच समोर आला असल्यामुळे या आजाराच्या मुळाशी जाऊन संशोधन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत उपाययोजना सुरू आहेत. घरगुती तेल, साबण, शॅम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही ही उत्पादने मुदतबाह्य झालेली नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.