नांदेड: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार धरून या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा दाखल झालेल्या गुन्ह्यात बालरोग विभागाच्या डॉक्टरांनाही आरोपी करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा यामुळे ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आता याच प्रकरणात रुग्णालयाचे अधिष्ठाताच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
लोहा तालुक्यातील अंजली वाघमारे या गरोदर महिलेला ३० सप्टेबर रोजी या रुग्णालयात दाखल करण्यातआले होते. दुसऱ्या दिवशी तिचे सामान्य बाळांतपण झाले. तिने कन्येला जन्म दिला. प्रारंभी बाळ आणि बाळंतीणीची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
मात्र दोन दिवसांनी बाळ आणि आईची प्रकृती बिघडल्याचे सांगून डॉक्टरांनी औषधे आणि रक्ताच्या पिशव्या मागवून घेतल्या.औषधी आणि रक्ताच्या पिशव्यांसाठी ४५ हजार रुपये खर्च आला. परंतु औषधे व रक्त पिशव्या आणूनही डॉक्टर उपचार देत नव्हते. तेथे डॉक्टर आणि नर्स नव्हते.
अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांना भेटून उपचार करण्याची विनंती केली, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असे अंजली वाघमारेचे वडिल कामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
शनिवारी बाळाचा मृत्यू झाला तर बुधवारी अंजली वाघमारेंचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अंजली वाघमारेचे वडिल कामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शामराव वाकोडे आणि बालरुग्ण विभागाचे डॉक्टरविरुद्ध भादंविच्या ३०५ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.