अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना आता दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मिळणार मदत, सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना!


मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता ही मर्यादा वाढवून बाधित शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असून या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे ८ हजार १३९ कोटी रुपये मदत निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. परंतु दोन हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्रासाठी राज्य शासनाने देऊ केलेली मदत तुटपुंजी असल्यामुळे ही मर्यादा वाढवण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील ६ लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.  यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे.

 कोणत्या विभागासाठी किती शेतकऱ्यांना लाभ?

छत्रपती संभाजीनगर विभाग: बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये.

नागपूर विभाग: नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3 हजार ९३१ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६९८.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ७ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये.

नाशिक विभाग नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५३ हजार ८६५ शेतकऱ्यांच्या ५० हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये.

अमरावती विभाग अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ६१५ शेतकऱ्यांच्या १ लाख ३९ हजार ४३८.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १३१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये.

पुणे विभाग सोलापूर व सांगली जिल्ह्यातील ८८ हजार १४३ शेतकऱ्यांच्या ७० हजार ४१८.८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १०३ कोटी ३७ लाख २० हजार रुपये.

कोकण विभाग ठाणे व पालघर जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांच्या २५.३३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी २ लाख १६ हजार रुपये.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!